Women Health: महिलांनो लक्ष द्या.. मेंदूच्या विकारांचं प्रमाण वाढतंय..60% महिलांना होतोय त्रास, तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा
Women Health: न्यूरोसर्जन सांगतायत की, सध्या महिलांमध्ये न्यूरोलॉजिकल विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. याबाबत काळजी करण्याची आवश्यकता भासत आहे.

Women Health: आजकाल दैनंदिन आयुष्यात महिला वर्ग आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शानास येतंय. अशात मायग्रेन, एपिलेप्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, पार्किन्सन आणि अल्झायमर यांसारख्या न्यूरोलॉजिकल विकारांचे प्रमाण देखील महिलावर्गात झपाट्याने वाढत चालले आहे. मेंदूचे हे विकार महिलांच्या दैनंदिन आयुष्याबरोबरच त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर तसेच त्यांच्या एकूण आरोग्यावर परिणाम करतात.
60% महिलांना सतावताय मेंदूशी संबंधित समस्या
वाशीतील न्यूईरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी सांगतात की, महिलांमध्ये आढळणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये मायग्रेन, अपस्मार (एपिलेप्सी), मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, पार्किन्सन, अल्झायमर आणि न्यूरोपॅथी सारख्या विकारांचा समावेश आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, सुन्नपणा, स्मरणशक्ती कमकुवत होणे, थकवा किंवा दृष्टी कमी होणे अशी सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास मज्जातंतूचे कायमचे नुकसान होते तसेच स्मरणशक्ती गमावणे, अपंगत्व किंवा जीवघेण्या स्ट्रोकचा सामना करावा लागू शकतो.
तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा
डॉ. कुट्टी पुढे सांगतात की , तणाव किंवा हार्मोनल बदलांमुळे महिलांना न्युरोलॅाजिकल विकारांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने निदानास विलंब होतो. वारंवार होणारी डोकेदुखी, अचानक येणारा अशक्तपणा किंवा बोलताना अडखळणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. सध्या 60 टक्के महिलांना मेंदूशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. दरमहा 25 ते 75 वयोगटातील 6 पैकी 10 महिलांना न्यूरोलॉजिकल विकारांचा सामना करत असल्याचे दिसून येते. 10 पैकी 3 महिलांना मायग्रेन तर 3 महिलांना अपस्मार, एका महिलेला स्ट्रोकचा धोका असल्याचे आढळून येते.
भविष्यातील गुंतागुंत टाळा
डॉ. कुट्टी यांनी सांगतात की , प्रगत इमेजिंग तंत्र, मिनीमली इव्हेसिव्ह न्यूरोसर्जरी, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारख्या आधुनिक तंत्रांमुळे महिलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता परत मिळवण्यास मदत होते. वेळोवेळी तपासणी, योग्य निदान, औषधोपचार, जीवनशैलीतील बदल आणि नियमित फॉलो-अप या भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























