(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : 'अंबे तूज वाचून कोण पुरविल आशा..!' चैत्र नवरात्रीत 'या' 3 शक्तिशाली पीठांना एकदा भेट द्याल, देवीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील
Travel : देशभरात हजारो वर्षे जुनी देवीची प्राचीन, ऐतिहासिक मंदिरे आहेत. असे मानले जाते की, जो कोणी नवरात्रीमध्ये 'या' मंदिरांना भेट देतो, देवी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.
Travel : वारी वारीं जन्ममरणाते वारी..हारी पडलो आता संकट निवारी.. देवी दुर्गामातेची आरती म्हणजे सर्व दु:खांवर मायेची फूंकर.. असं म्हणतात, जर तुम्ही देवीची मनापासून उपासना केली तर देवी सदैव आपल्या भक्तांचे रक्षण करते. 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी मातेच्या मंदिरात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवासाठी भाविकांचा उत्साह द्विगुणित होतो. या नवरात्रोत्सवादरम्यान भारतातील अनेक प्रसिद्ध देवी मंदिरांना भाविक भेट देतात. देशभरात हजारो वर्षे जुनी देवी मातेची प्राचीन, ऐतिहासिक मंदिरे आहेत. असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीमध्ये या मंदिरांना भेट देतो, देवी माता त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. जाणून घ्या या मंदिरांबद्दल..
देवीच्या दर्शनासोबतच निसर्गसौंदर्याचं अप्रतिम दृश्य!
जर तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या मातेच्या वैष्णोदेवी मंदिराला भेट दिली असेल आणि यावर्षी तुम्ही देवीच्या आशीर्वादासाठी या शक्तीपीठांना भेट देण्यासाठी जाऊ शकता. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील प्रसिद्ध शक्तीपीठांबद्दल सांगणार आहोत, जिथे दर्शनासोबतच तुम्हाला पर्वतांचे सुंदर दृश्यही पाहायला मिळेल. कोणते आहेत ते शक्तीपीठ? जाणून घेऊया..
चंद्राबादनी मंदिर, टिहरी
मातेचे हे मंदिर उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील जमनीखल नावाच्या छोट्या गावात आहे. हे देवप्रयागपासून 35 किमी अंतरावर आहे. हे मंदिर भारतात स्थापन झालेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मातेच्या मंदिरात देवी सतीचे धड पडले होते. येथे मंदिरात तुम्हाला कासवाच्या पाठीच्या आकाराचा दगड सापडेल. येथे मातेची मूर्ती नाही तर या आकारात पूजली जाते. एप्रिल महिन्यात मंदिरात जत्रा भरते ज्यात मोठ्या संख्येने भाविक येतात. हे उत्तराखंडमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
सुरकंदा, टिहरी
देवी मातेचे हे मंदिर जौनुपर जिल्ह्यातील सुरकुट पर्वतावर आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3 हजार मीटर उंचीवर आहे. येथून तुम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री म्हणजेच चार धाम एकत्र दिसतील. अशी धारणा आहे की, सती मातेचं डोकं इथेच पडलं होतं. त्यामुळे त्याचे नाव सुरकंदा मंदिर असे आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला 2.5 किमी चढावे लागेल.
नैना देवी मंदिर, नैनिताल
वैष्णोदेवीपासून सुरू होणाऱ्या नऊ देवी यात्रेत नैना देवी मंदिराचे नावही येते. या मंदिरात देवीचे डोळे पडले होते असे मानले जाते. त्यामुळे या मंदिराला नैना देवी असे नाव पडले. येथे देवीच्या दोन डोळ्यांची पूजा केली जाते. समुद्रसपाटीपासून 1100 मीटर उंचीवर वसलेले आहे. मंदिराजवळ एक गुहा आहे जी नयनादेवी गुहा म्हणून ओळखली जाते. माता नैना देवीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>