Janmashtami 2023: जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या 'या' प्रभावी महामंत्रांचा जप करा, जीवनातील दुःख होतील दूर!
Janmashtami 2023 Mahamantra : भगवान श्रीकृष्णाच्या या मंत्रांचा जप केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. कृष्णाचे प्रभावी मंत्र आध्यात्मिक आणि मानसिक लाभ देतात.
Shri Krishna Janmashtami 2023 Mahamantra : संपूर्ण देशात आज कृष्णजन्माष्टमी (Janmashtami 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांचा (Shri Krishna) जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. त्यामुळे दरवर्षी या तिथीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जाणार आहे.
यंदाची जन्माष्टमी खास! अनेक शुभ आणि विशेष योग
6 सप्टेंबर रोजी गृहस्थ जन्माष्टमीचे व्रत आणि पूजा करतील. तर 7 सप्टेंबर रोजी वैष्णव पंथाचे लोक जन्माष्टमी साजरी करतील. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी 2023 मध्ये 30 वर्षांनंतर जन्माष्टमीला अनेक शुभ आणि विशेष योग देखील बनले आहेत. या वर्षी जन्माष्टमी, वृषभ राशी, रोहिणी नक्षत्र, बुधवारी सर्व उद्दिष्टे साध्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
श्रीहरीचा आठवा अवतार
भगवान श्रीकृष्णांना श्रीहरीचा आठवा अवतार म्हटले जाते. श्रीकृष्णाच्या अद्भुत लीला, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण आम्ही तुम्हाला श्री कृष्णाच्या काही प्रभावी मंत्रांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा जप करून तुम्ही भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करू शकता, जन्माष्टमीला त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता. या मंत्रांना भगवान श्रीकृष्णाचा महामंत्र म्हणतात. असे मानले जाते की या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक आणि मानसिक लाभ होतो आणि जीवनातील समस्या दूर होतात. तुम्ही या मंत्रांचा इतर दिवशी किंवा नियमितपणे जप करू शकता.
भगवान कृष्ण महामंत्र
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
दररोज सकाळी स्नान केल्यानंतर या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने देवाची कृपा होते आणि मानसिक शांतीचा अनुभव येतो.
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
असे मानले जाते की या महामंत्राचा 108 वेळा जप केल्याने मन शांत होते आणि घरात सुख-समृद्धी वाढते. या मंत्रात कृष्ण, हरी आणि राम ही नावे आढळतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप कराल तेव्हा तुमच्या मनात परमेश्वराप्रती प्रेम आणि भक्तीच्या भावना निर्माण होईल.
ओम कृष्णाय नम:
भगवान श्रीकृष्णाची पूजा किंवा स्मरण करताना या मंत्राचा जप करणे लाभदायक मानले जाते. या मंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक शांती मिळते.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:
जर तुम्हाला तुमच्या घरात शांतीपूर्ण वातावरण हवे असेल आणि सुख-समाधान हवे असेल, तर या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. यामुळे कलह आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहील.
ओम नमो भगवते श्री गोविंदाय नमः
विवाहात अडथळे येत असतील तर या मंत्राचा जप केल्याने फायदा होतो. या मंत्राचा दररोज जप केल्याने प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येतो. तसेच विवाहातील अडथळेही दूर होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)