Raksha Bandhan : रक्षाबंधनाला भद्रा योग,तरीही पंचांगकर्ते दातेंचं काळजी न करण्याचं आवाहन; नेमका आहे तरी काय भद्रा योग?
भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेलं आहे. ज्या भद्राकाळाची जोरदार चर्चा आहे नेमका काय असतो हा भद्रा काळ? जाणून घेऊ याविषयी
Rakshabandhan 2023: श्रावण सुरू झाला आणि सणांची सुरुवात झाली. यंदा रक्षाबंधनापेक्षा (Raksha Bandhan) अधिक चर्चा होत आहे ती त्यादिवशी येणाऱ्या भद्रायोगाची... रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य असल्याची सध्या चर्चा आहे. परंतु पंचागकर्ते दाते गुरूजी म्हणतात भद्रा योगात देखील तुम्हाला रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेलं आहे. ज्या भद्राकाळाची जोरदार चर्चा आहे नेमका काय असतो हा भद्रा काळ? काय आहे त्यामागील पौराणिक कथा? या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
पंचाग अभ्यासक प्रितम पुरोहित यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कालमापन पद्धतीत महिना हा चंद्रावरून मोजला जातो. अमावास्येला संपणारा (अमावास्यांत मास) किंवा पौर्णिमेला संपणारा ( पौर्णिमांत मास ) अशी मासगणना केली जाते.आपले बहुतेक सण, उत्सव, चांद्रमासानुसार म्हणजे तिथीनुसार साजरे केले जातात.पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त परिणाम पृथ्वीवर होतो. हिंदू धर्मात दिनांकाऐवजी चंद्राच्या तिथीला महत्त्व दिले गेले आहे.
तिथीचे प्रकार
नंदा तिथी - आनंद देणाऱ्या
भद्रा तिथी- कल्याणकारी असतात
जया तिथी - जय देणाऱ्या असतात
रिक्ता तिथी - अशुभ असतात
पूर्णा तिथी- पूर्ण करणाऱ्या
मराठी दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष येतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात चार वेळा भद्रा योग येतो. अष्टमी आणि पौर्णिमाच्या पूर्वार्धाला, चतुर्थी आणि एकादशीच्या उत्तरार्धात भद्रा दृष्टी असते. तसेच सप्तमी आणि चतुर्दशीच्या पूर्वार्धाला भद्रा असतो.
भद्राकाळ अशुभ मानला जातो. बारा राशीच्या संक्रमणात चंद्र भ्रमण मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीतून होताना भद्रा तिन्ही लोकापैकी 'स्वर्ग लोकात' असते. तर कन्या, तुळ, धनु, मकर राशीत भद्रा 'पाताळ लोकात' आणि कर्क, सिंह, 'कुंभ', मीन राशीत असता भद्रा 'पृथ्वी लोकात' असते. त्यानुसार 30 ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र 'विष्टी' करण आणि 'कुंभ' राशीत असणारं आहे. याच अनुषंगाने या दिवशी भद्राकाळ आहे.
पौराणिक कथेनुसार भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनीदेवाची बहीण आहे. भद्रा देखील शनीदेवाप्रमाणेचं शीघ्रकोपी, विघ्नसंतोषी होती. बालपणापासूनच ती ऋषीमुनींच्या दैवी, धार्मिक कार्यात, उपासनेत विघ्न आणत असे. सूर्यदेवानी ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली. त्यावर ब्रह्मदेवांनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टी करणात स्थान दिले. भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल. भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी पौराणिक मान्यता आहे.
मात्र पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले, होम हवन करून केलेल्या रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य सांगितला आहे. मात्र आत्ता आपण जे रक्षाबंधन साजरे करताना आपण फॅन्सी राख्या बांधतो. त्यामुळे बहिणीने भावाला राखी बांधताना, मित्राने मित्राला बांधताना, समाजबांधवांनी ऐकमेकांना बांधताना भद्रा काळ वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बुधवारी रक्षाबंधन दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा . या दिवशी कोणतीही वेळ पाळण्याची गरज नाही त्यामुळे भाऊ-बहिणी दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात.
हे ही वाचा :