Ashadhi Wari: आषाढी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाचा आत्मा असलेली पंढरी वारकरी वाद्यांनी नगरी सजली; वारीत होते लाखोंची उलाढाल
Ashadhi Wari: वारकरी दिंड्या घेऊन पंढरीला येतात या दिंडीचा आत्मा असतो वीणा आणि मृदूंग आणि त्याला साथ मिळते शेकडो टाळांची, वारकरी संगीताची ही तीन मुख्य वाद्ये ही ओळख असते.
पंढरपूर : विठुरायाला पिढ्यान पिढ्या दैवत मानून साऱ्या समतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाचा (Ashadhi Wari) भक्ती रस हा वारकरी संगीता शिवाय केवळ अपुरा आहे. वारकरी संप्रदायातील शेकडो संतांनी विश्वाला लाखो अनमोल अभंग रचना दिल्या. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांच्यासह संत जनाबाई, संत मुक्ताबाई , गोरा कुंभार, संत रोहिदास , संत चोखोबा असे शेकडो संतांनी आपापल्या काळात या रचना करून ठेवल्या ज्या आजही अजरामर आहेत. याशिवाय वारकरी संप्रदायात भजन , कीर्तन , भारूड , गवळणी आणि प्रवचनालाही अनन्यसाधारण महत्व आहे. वारकरी संप्रदायाचे हे वारकरी संगीताची एक वेगळी ओळख गेल्या शेकडो वर्षांपासून आजही तीच अवीट गोडीसह टिकून आहे. वारकरी दिंड्या घेऊन पंढरीला येतात या दिंडीचा आत्मा असतो वीणा आणि मृदूंग आणि त्याला साथ मिळते शेकडो टाळांची, वारकरी संगीताची ही तीन मुख्य वाद्ये ही ओळख असते. यासोबत चिपळ्या , डफ आणि खंजिरी याचाही वापर वारकरी संगीतात केला जातो . वारकरी संप्रदायाचा पाईक गळ्यात टाळ असल्या शिवाय दिंडीत सहभागी होत नाही आणि म्हणूनच पंढरपूर मध्ये ही वारकरी वाद्यांची खास बाजारपेठ आहे ज्यातून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते.
कासांचे टाळ पितळेच्या टाळांपेक्षा महाग
प्रत्येक वारकऱ्याला खरेदी करायला लागणारे टाळाचे उत्पादन अहमदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होत असते. यात्रेपूर्वी या भागातून हजारोंच्या संख्येनी टाळाच्या धातूच्या वाट्या नगर मधून पंढरपूरला येत असतात. या टाळात कास आणि पितळ असे दोन मुख्य धर्तीचे बनलेले असतात. कासाच्या टाळामधून सूर चांगला निघत असल्याने या टाळाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. कासांचे टाळ पितळेच्या टाळांपेक्षा महाग असले तरी दिंडी मध्ये सर्वसाधारण वारकरी हे कासांचे टाळाचा जास्त वापर करतात. या टाळाचे वजनावरून प्रकार पडतात. 20 ग्राम पासून 1 किलो पर्यंत विविध वजनाचे टाळ बाजारात उपलब्ध असतात पण दिंडी मधील वारकरी साधारणपणे 700 ते 800 ग्राम वजनाचे टाळ वापरतात. या टाळांच्या वाट्यांना खिळे आणि मणी बसवून येथील व्यापारी गळ्यात अडकविण्यासाठी पट्टे जोडून विक्रीला तयार ठेवतात . टाळांच्या दोन्ही वाट्या मधून खिळा बसवून त्याला मणी लावून हुकात हे पट्टे अडकविले जातात . पितळी टाळ हे पंढरपूर मध्येच तयार केले जातात मात्र त्याला फारशी मागणी नसते. टाळांच्या वजनावरही त्यातून निघणारे स्वर अवलंबून असल्याने सर्वसाधारणपणे वारकरी हे कीर्तनी म्हणजे मोठे टाळ खरेदी करतात .
टाळासोबत पंढरपूर मध्ये बनलेल्या वीणा आणि पखवाज याची खरेदी देखील फक्त पंढरपूर मधूनच खरेदी केली जाते . यासाठी सागवानी किंवा महाडिकाचे लाकडाचा वापर केला जातो . कोणतीही दिंडी पहिली की त्यामध्ये गळ्यात पखवाज घेऊन वाजविणारे असल्याशिवाय भजनाला हवा तो तालच मिळत नाही. याशिवाय वारकरी संप्रदायातील कीर्तने , प्रवचने आणि सप्ताहाला देखील पखवाजाची गरज असते. याच्या आकारावरून पखवाज आणि मृदूंग हे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. लोखंडी पखवाज वजनाला जास्त असल्याने सध्याच्या काळात याचा वापर केवळ कीर्तनात आणि बैठ्या कार्यक्रमात केला जातो.
पखवाजाच्या किमती तीन हजार रुपयापासून 15 हजार रुपयापर्यंत
सध्या दिंडीत दिसणारे पखवाज हे स्टील पासून बनविलेले असतात. या पखवाजाला दोन्ही बाजूने म्हैस किंवा शेळीचे चामडे लावून ते चामड्याच्या वादीने आवळून बसविण्यात येते . यावर शाई लावून या चामड्यातून हे कलाकार सूर निर्माण करतात. पखवाजाला दोन्ही तोंडाला जी चामड्याची शिवण असते त्यावर हातोडीने ठोकून सूर लावला जातो. पखवाजाच्या किमती तीन हजार रुपयापासून 15 हजार रुपयापर्यंत असतात. वीणा बनवितानाही लाकडाचा वापर करून त्यावर तारा लावण्यात येतात. या वीणा 8 इंच ते 16 इंच प्रकारात उपलब्ध होतात.वीणांचा वापर भजन, कीर्तन आणि प्रवचनात केला जातो.
जवळपास 35 प्रकारची वाद्ये तयार केली जातात
वारकरी वाद्यांच्या मध्ये खंजिरी, डफ, चिपळ्या याचीही निर्मिती पंढरपूर मध्ये केली जाते . येथील प्रदक्षिणा मार्गावर कोकाटे, पुली यासारखे भजनी वाद्ये बनविणारे कारखानदार अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय करीत आहेत. आषाढी यात्रा ही राज्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने दिंडीकरी , भजनी मंडळी या यात्रेत वारकरी वाद्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात . पांडुरंगाच्या नगरीतून हे भजनी साहित्य घेणे हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने भाग्याचे मानले जात असल्याने या वारकरी वाद्यांची लाखो रुपयांची उलाढाल पंढरपूर मध्ये दरवर्षी होत असते . हे कारखानदार वारकरी वाद्यांच्या सोबत जवळपास 35 प्रकारची वाद्ये येथे बनवितात . इतर प्रकारच्या वाद्यांना वर्षभर मागणी असल्याने हे कारखाने बारा महिने गरजेनुसार वाड्यांचे उत्पादन घेत असतात . आषाढी यात्रा काळात जवळपास एक कोटींची उलाढाल होत असते .