Pregnancy Tips : गरोदरपणात महिलांना अन्न पाहताच उलटी का होते? अन्नाचा वासही का सहन होत नाही? 'हे' आहे यामागचं कारण
Pregnancy Tips : गर्भधारणे दरम्यान सुरुवातीचे तीन महिने कोणतेही पदार्थ पाहिल्यानंतरही महिलांना उलटी झाल्यासारखे वाटते.
Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान (Pregnancy Tips) उलट्या आणि मळमळ होणं हे सामान्य लक्षण मानले जाते. गर्भधारणेदरम्यान प्रत्येक स्त्रीला या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या दरम्यान महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो यासाठी त्या अनेकदा काहीही खाणं टाळतात. काही स्त्रिया असंही म्हणतात, की गर्भधारणे दरम्यान सुरुवातीचे तीन महिने कोणतेही पदार्थ पाहिल्यानंतरही महिलांना उलटी झाल्यासारखे वाटते. गर्भधारणे दरम्यान उलट्या होणं हे सामान्य लक्षण आहे का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
गर्भधारणेदरम्यान अन्न पाहिल्यानंतर उलट्या का होतात?
Journals.uchicago.edu मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, गरोदरपणात महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. त्याचे काही फायदेही आहेत. हे गर्भवती महिलेच्या शरीराची संरक्षण यंत्रणा म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत, ते आई आणि मुलासाठी आवश्यक नसलेल्या अन्नाचा वास नाकारतात. यामुळेच अन्न पाहिल्यानंतर किंवा त्याचा वास आल्यावर महिलांना मळमळ होते.
उलट्या आणि मळमळ होणं गर्भपाताशी संबंधित आहे का?
Jamanetwork.com मध्ये प्रकाशित झालेल्या दुसर्या एका अभ्यासानुसार, ज्या महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत उलट्या किंवा पोटात मळमळ होणे यांसारख्या समस्या जाणवतात त्यांना गर्भपातासारख्या समस्या फार कमी होतात. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मॉर्निंग सिकनेस ही गर्भधारणेदरम्यान होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याचा प्रत्येक स्त्रीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान जर तुम्हाला वारंवार उलट्या होत असतील किंवा पोटात मळमळ जाणवत असेल तर घाबरण्याची काही गरज नाही.
मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय?
मॉर्निंग सिकनेस हे गरोदर असण्याच्या पहिल्या लक्षणांपैकी एक आहे. गरोदरपणाच्या पहिल्या सहा आठवड्यांनंतर महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. असं म्हटलं जातं की मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ होण्याची लक्षणं दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत आपोआप कमी होत जातात. पण, काही स्त्रियांमध्ये हा त्रास गर्भधारणेच्या संपूर्ण प्रक्रियेपर्यंत असतो. मात्र, अशा केसेस फार कमी आहेत. साधारण 100 पैकी फक्त एका महिलेला दीर्घकाळ उलट्या आणि पोटात मळमळण्याचा त्रास असेल. याला हायपरमेसिस ग्रॅव्हिडारम असे देखील म्हणतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.