![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
स्पेनमध्ये मासिक पाळीच्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर, भारतातही सुट्टी द्यावी की कामात सूट द्यावी? काय वाटतं पुरुषांना?
मासिक पाळीचा प्रश्न केवळ सुट्टीने प्रश्न सुटेल का? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहतो आणि त्यातून असंख्य प्रश्न जन्माला येतात त्यातल्याच काही प्रश्नांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न.
![स्पेनमध्ये मासिक पाळीच्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर, भारतातही सुट्टी द्यावी की कामात सूट द्यावी? काय वाटतं पुरुषांना? Menstruation Leave in Spain for women India should also be given a holiday What do people think स्पेनमध्ये मासिक पाळीच्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर, भारतातही सुट्टी द्यावी की कामात सूट द्यावी? काय वाटतं पुरुषांना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/0e1bf099aecfe0ff6ef18d32f4d60319167731789319289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Menstrual Leave: स्पेनच्या (Spain) संसदेने महिलांसाठी एक मोठा मासिक पाळीच्या (Menstruation Leave) काळात सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे जगभरात स्वागत झाले, सुट्टीचा हा निर्णय घेणं हे अतिशय क्रांतिकारी पाऊल आहे, अशा प्रतिक्रिया आल्या. तर दुसरीकडे महिलांना अशी सुट्टी मिळायला हवी की नको? यावरून दोन गट आहेत. या निर्णयाचं समर्थन करणारा एक गट आहे तर या निर्णयामुळे महिलांचं नुकसान होईल असं मत असणारा दुसरा गट आहे. स्पेनने हे पाऊल टाकून सुरुवात केली. उद्या अनेक देश स्पेनच्या पावलावर पाऊल टाकतील. कालांतराने शासकीय पातळीवरही असा विचार होईल. पण केवळ सुट्टीने प्रश्न सुटेल का? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहतो आणि त्यातून असंख्य प्रश्न जन्माला येतात त्यातल्याच काही प्रश्नांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न.
स्पेनने महिलांना दिलेली सुट्टी आणि मासिक पाळी दरम्यान पगारी सुट्टी मिळावी यासाठी दाखल केलेली जनहितयाचिका सुप्रीम कोर्टाने नाकारणे या दोन्ही गोष्टी आठवड्याभराच्या अंतराने घडल्या. यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. मासिक पाळी दरम्यान सुट्टी दिल्यास कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष असमानता वाढेल का? यामुळे महिलांच्या संधी कमी होतील का? की महिलांचा यामुळे फायदा होईल? स्त्रीरोगतज्ज्ञ याविषयी काय सल्ला देतात? महिलांना काय वाटतं? खसगी संस्थेतील पुरूष कर्मचाऱ्यांना काय वाटतं? याविषयीचे सर्व दृष्टीकोन आपण या लेखात पाहणार आहोत.
क्लाऊड नाईन रुग्णालयाचे मॅनेजिंग डायरेक्टर निखील दातार म्हणाले, मासिक पाळी हा कोणताा आजार नाही. ती नैसर्गिक आहे. मासिक पाळी दरम्याान काही महिलांना त्रास होतो. पण त्रास होतो म्हणून सरसकट सुट्टी देणे योग्य नाही. कारण यामध्ये दोन मुद्दे समोर येतात जर महिलांना त्रास होतो म्हणून सुट्टी दिली तर पुरुषांचे काय? काही पुरुषांना देखील बद्धकोष्ठता, मायग्रेन अशा अनेक समस्या आहेत. मग त्यांना सुट्टी देणार का? दुसरी गोष्ट म्हणजे मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी दिलीच तर लॉजिस्टिक कसं मॅनेज करणार? खरचं मासिक पाळीसाठी सुट्टी घेतली हे कसं कळणार? बरं ऑफिसमधून सुट्टी मिळेल पण घर कामातून स्वतः बायका सुट्टी घेतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. महिलांना मासिक पाळी दरम्यान त्रास होतो हे खरं आहे पण सरसकट सुट्टी देणे हा त्यावरचा पर्याय नाही. ज्या महिलांना त्रास होतो त्या महिलांनी त्यासाठी उपचार घेणे गरजेचे आहे. मासिक पाळीत वेदना होत असतील तर त्याची अनेक कारणे आहेत त्याचे निदान होणे गरजेचे आहे. घरामध्ये देखील या विषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.
तर 25 वर्षाची पीसीओडीचा त्रास असणारी नेहा म्हणते, मला पीसीओडीचा त्रास आहे. माझी पाळी अनियमित येते. मासिक पाळी दरम्यान माझ्या ओटी पोटात प्रचंड वेदना होतात. दर महिन्याला ओव्हरफ्लो होतो. मासिक पाळी दरम्यान त्रास होत असेल तर रजा देताना देखील वरिष्ठ, सहकाऱ्यांकडून उपकाराची भावना दाखवली जाते पुरुष वरिष्ठ असेल तर हा त्रास कधी सांगितलाच जात नाही. मासिक पाळी स्त्रीला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. यासाठी रजा मिळाली नाही तर अवघडलेपण सोसून काम करावे लागते. जर त्रास होत असेल तर मासिक पाळीत रजा मिळणे हा सुद्धा तिचा हक्क असायला हवा. याचा प्रत्येक कंपनीच्या, शासकीय प्रक्रियेच्या व्यवस्थापनशास्त्राकडून स्वीकार झाला पाहिजे.
तर विजय म्हणाला, मी सध्या ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे माझ्या शिफ्टमध्ये मी सोडलो तर काम करणाऱ्या सर्व महिला सहकारी आहेत. मासिक पाळीत जर त्रास होत असेल तर सुट्टी मिळावी या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु सरसकट सुट्टी देणे चुकीचे आहे. समजा माझ्या शिफ्टमधील सर्व महिला सहकारी कर्मचाऱ्यांनी मासिक पाळीचे कारण सांगत सुट्टी घेतली तर त्या दिवसात कामचा भार माझ्यावर किंवा इतर सहकाऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. सरसकट सुट्टी देण्यापेक्षा ज्यांना खरच त्रास आहे, अशाच सहकाऱ्यांना सुट्टी मिळावी.
तर नुकतीच वर्षभरापूर्वी नोकरीला लागलेली 22 वर्षाची अक्षया म्हणते, मासिक पाळीत सुट्टीची गरज नाही. मला मासिक पाळीदरम्यान अजिबात त्रास होत नाही. फक्त पहिल्या दिवशी मूड स्विंग होतात. चिडचिड होते कधीतर कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी सहकऱ्यांनी समजून घ्यावे. वरिष्ठांना देखील महिन्यातून एक - दोन दिवस नियमित कामापेक्षा थोडे कमी काम झाले तर आमची अडचण समजून घ्यावी. वरिष्ठ पुरूष असल्याने माझ्या समस्येविषयी थेट त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी कामात थोडी सूट द्यावी.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)