International Tea Day: कारण 'तो' प्रत्येकासाठी स्पेशल असतो, आज जागतिक चहा दिन, का साजरा केला जातो हा दिवस?
International Tea Day: चहा हे पेय फक्त भारतातच नाही तर जगभरात लोकांच्या आवडीचं आहे. जाणून घेऊया काय आहे जागतिक चहा दिनाचं महत्त्व
International Tea Day: चहाला (Tea) वेळ नसते तर वेळेला चहा असतो असं म्हणतं चहाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व लोकं स्पष्ट करतात. चहा हे पेय कोणत्याही वयोगटातील लोकांच्या आवडीचे पेय आहे. सकाळच्या चहाने दिवसाची सुरुवात करणारे लोक ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गप्पा मारताना चहा पिणारे लोक असा सर्वासाधारणपणे चहाचा दिवसभराचा प्रवास असतो. हा चहा फक्त भारतीयांसाठीच नव्हे तर जगभरातील लोकांच्या आवडीचे पेय आहे. आज जागतिक चहा दिनानिमित्त जाणून घेऊया या चहाबद्दल.
चहाचा नेमका इतिहास काय?
कथेनुसार असं म्हटलं जातं की, 2700 इसवी सनपूर्व चीनचा शासक नुंग हा बागेत बसून पाणी पित होता. त्याच्या चहात एक पान पडलं आणि पाण्याचा रंग बदलला. त्याने जेव्हा त्या पाण्याची चव घेतील तेव्हा त्याला ती खूप आवडली. तेव्हापासून चहाचा जन्म झाला असं म्हटलं जातं. असा चहाचा जागतिक स्तरावर शोध लागल्याचं सांगितलं जातं.
भारतात चहाचा शोध
खरंतर चहा हे मूळचे भारतीय पेय नाही. पण सध्या चहाचे सेवन भारतात बऱ्याच ठिकाणी खूप आवडीने करतात. असं म्हटलं जातं की भारतात चहाचा शोध एका बौद्ध भिक्षूंनी लावला. सहाव्या शतकात एक भारतीय बौद्ध भिक्षू चीनच्या हुनान प्रांतात न झोपता ध्यान करायचे. ते ध्यान करताना जागृत राहण्यासाठी एक वनस्पती चघळायचे. ही वनस्पती नंतर चहाची वनस्पती म्हणून ओळखली जाऊ लागली.
भारतात चहा सोळाव्या शतकात ब्रिटीशांनी आणला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात चहाच्या उत्पादनाची सुरुवात केली. तसेच ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये पहिली चहाची बाग सुरु केली आणि त्यानंतर भारतात चहाचा व्यापार वाढतच गेला. भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रामुख्याने चहाची लागवड केली जाते. तसेच भारतीय चहाला जगभरातून मागणी आहे.
जागतिक चहा दिनाचा इतिहास
चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. चीन, भारत, केनिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. याव्यतिरिक्त टांझानिया, बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातही चहाचे उत्पादन घेतले जाते. मुंबई शहरातील काही व्यापाऱ्यांच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या बैठकीत 15 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा करायचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 2005 सालापासून 15 डिसेंबरला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यात आला.
भारताने 2015 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने यावर अनेक देशांचा विचार घेऊन 21 मे हा जागतिक चहा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला.
चहा जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाण्याऱ्या पदार्थापैकी एक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असते. कुणाला आलं घालून चहा प्यायला आवडतं तर कुणाला ब्लॅक टी प्यायला आवडते.चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा निर्यात करणारा देश आहे. भारतातही चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं पण स्थानिक स्तरावर त्याचं सेवनही मोठ्या प्रमाणात केलं जातं. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केलं जातं.