World organ donation day 2024: अवयवदानामुळे जीवाला धोका? समज-गैरसमज काय आहेत? त्यामागील सत्य जाणून घ्या...
World organ donation day 2024: आज जागतिक अवयवदान दिवस, या निमित्त अवयवदानाशी संबंधित समज-गैरसमज आणि त्यामागील सत्य काय? जाणून घ्या..
World organ donation day 2024 : आपले अवयव म्हणजे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही अवयनदान करत असाल तर हे रक्तदानासारखेच महान दान मानले जाते, परंतु तरीही लोक ते करण्यास घाबरतात, कारण त्याबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जसे की - अवयवदानासाठी खूप खर्च येतो, अवयवदानामुळे जीवाला धोका असतो इ. अशाच काही गैरसमजांची आपण माहिती घेणार आहोत. आज 13 ऑगस्ट. हा दिवस दरवर्षी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जाणून घ्या महत्त्वाची माहिती...
रक्तदानानंतर अवयवदान सर्वात मोठे दान..!
रक्तदानानंतर अवयवदान हे सर्वात मोठे दान मानले जाते. अवयवदान करून तुम्ही अनेकांचे प्राण वाचवू शकता. लोकांमध्ये याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने, दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिवस साजरा केला जातो. अवयवदानाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे लोक त्यासाठी पुढे येत नाहीत. लोकांना अवयवदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांचे गैरसमज दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
गैरसमज 1 : प्रत्येकजण अवयव दान करू शकतो.
वस्तुस्थिती : असे नाही, कर्करोग, कोणत्याही संसर्गाने ग्रस्त आणि एचआयव्ही सारख्या काही आजारांच्या बाबतीत अवयवदान करता येत नाही.
गैरसमज 2 : यामध्ये मृत्यूचा धोका असतो.
वस्तुस्थिती : हा गैरसमज आहे. अवयवदान करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञ संबधित व्यक्तीची पूर्ण तपासणी करतात, त्यानंतरच अवयवदानाची प्रक्रिया पुढे होते. प्रत्येक स्थितीत प्रथम अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
गैरसमज 3: फक्त हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान केले जाऊ शकतात.
वस्तुस्थिती : हा देखील अवयवदानाशी संबंधित गैरसमज आहे. हृदय, मूत्रपिंड आणि यकृत व्यतिरिक्त, स्वादुपिंड, फुफ्फुसे, लहान आणि मोठे आतडे, त्वचा, हाडे, हृदयाच्या विविध ऊतकांचे दान केले जाऊ शकते.
गैरसमज 4: अवयव आणि ऊतींचे दान केल्याने शरीराचे नुकसान होते.
वस्तुस्थिती : अवयवदान प्रक्रियेत शस्त्रक्रियेव्दारे अवयव सुरक्षितपणे काढला जातो. अवयवदानानंतर मृतदेह अंत्यसंस्काराच्या आधी सारखाच राहतो. नेत्रदान केल्यानंतर कृत्रिम डोळ्याचे रोपण करून पापण्या बंद केल्या जातात. हाडांचे दान केल्यानंतर त्या ठिकाणी मृतदेहात रॉड टाकला जातो.
गैरसमज 5: अवयवदानामध्ये कुटुंबासाठी अतिरिक्त खर्च समाविष्ट असतो.
वस्तुस्थिती : हे पूर्णपणे चुकीचे आहे. अवयवदात्याच्या कुटुंबाला या संदर्भात कोणताही अतिरिक्त खर्च सहन करावा लागत नाही, उलट अवयव प्राप्तकर्ता सर्व खर्च उचलतो.
हेही वाचा:
काय सांगता! हेडफोन्समुळे 100 कोटी तरुण बहिरे होणार? WHO चा धक्कादायक खुलासा, रिपोर्टमध्ये नेमकं म्हटलंय तरी काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )