World Hepatitis Day: दूषित पाणी आणि अन्नामुळे यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णसंख्येत वाढ; 'असा' ठेवा आहार
World Hepatitis Day: दूषित पाणी आणि अन्नामुळे यकृताच्या आजारासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने त्रस्त रूग्णांची संख्या वाढत असून आहार, पथ्य पाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
World Hepatitis Day: मुंबईत पाऊस कोसळत असल्याने दूषित पाणी आणि अन्नामुळे यकृताच्या आजारासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने त्रस्त रूग्णांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात हिपॅटायटिस ए आणि ई ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. यकृतासंबंधीत समस्या दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. उघड्यावरचे अन्ने, पूर्णपणे न शिजलेले अन्न आणि भाज्या खाणे टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ दूषित पाण्याचा वापर करुन बनविली जाता त्यामुळे त्यांचे सेवन करणे टाळा. हिपॅटायटिस साठी लसीकरण करणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ हर्षद जोशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात हिपॅटायटिस संसर्गासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमध्ये वाढ होते. लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत कुठल्याही व्यक्तींना यकृताचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचा संसर्ग होतो. पोटदुखी, जुलाब आणि मळमळ यामुळे आमांश आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवतात. टायफॉइड हा एक गंभीर जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे खूप ताप, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होतात. दूषित पाण्यामुळे हिपॅटायटिस ए आणि कावीळ सारख्या आजारांची लागण होते. हिपॅटायटिस ए म्हणजे यकृताचे संक्रमण (सूज). अस्वच्छता, पाणी आणि दूषित अन्नामुळे यकृताचे कार्य बिघडण्याची शक्यता वाढते. एखाद्याला काविळीचा त्रास होतो ज्यामुळे डोळे पिवळे दिसणे, पिवळी गडद लघवी, पोट दुखणे इत्यादी लक्षणे आढळून येत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ
झायनोवा शाल्बी रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ विकास पांडे म्हणाले की, हिपॅटायटिस ए किंवा ई दूषित अन्न किंवा पाण्यामुळे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कामुळे उद्भवतो. रस्त्यावरील अन्नपदार्थांचे सेवन किंवा दूषित पाण्याने धुतलेली फळे, फळांचा रस आणि दूषित पाणी किंवा बर्फापासून तयार केले पदार्थ जसे की पाणीपुरी, गोळा, सरबत, योग्यरित्या न शिजविलेले अन्न आणि भाज्या खाणे यामुळे एखाद्याला हिपॅटायटिस होण्याची शक्यता असते. 2021 मध्ये, पावसाळ्यात यकृत आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने ग्रस्त 110 लोकांवर उपचार करण्यात आले. 2022 मध्ये ही रुग्णसंख्या 326 वर पोहोचली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून यकृताचा त्रास आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने त्रस्त 220 रुग्ण आढळून आले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे यकृत आणि पोटाशी संबंधित विकार वाढतात. त्यामुळे ऋतू कोणताही असो पुरेसे पाणी पिणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलेय
काळजी घेणे आवश्यक
हिपॅटायटिस ए आणि ई रुग्णाच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू शकतात. वेळीच उपचार न केल्यास ते यकृताचे नुकसान करू शकतात. जेव्हा त्वचा आणि डोळे पिवळे होतात तेव्हा हिपॅटायटिस ए आणि ई कावीळ म्हणून निदान होते. वेळीच उपचार न घेतल्यास एखाद्याची प्रकृती बिघडू शकते ज्यामुळे यकृत निकामी होते आणि शेवटी यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते असे मेडिकवर हॉस्पिटल्सचे यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ विक्रम राऊत यांनी सांगितले.
बाहेरचं खाणं टाळा
या आजारावरील उपचार हे लक्षणांवर आधारित असतात आणि प्रत्येक व्यक्तीनुसार ते वेगवेगळे असतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधेच टाळू नका. ताजे आणि योग्यरिता शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा, स्ट्रीट फूड खाणे टाळा आणि पाणी गाळून आणि उकळून प्या. बाहेरील फळांचा रस आणि इतर पेयांचे सेवन टाळा. रस्त्यावर विक्रिसाठी उपलब्ध असलेली कापून ठेवलेली फळे खाऊ नका, वारंवार हात धुवा आणि वैयक्तिक स्वच्छता राखा असा सल्ला डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.
(ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. आजाराचे निदान आणि त्यावरील उपचारासाठी आपल्या डॉक्टरांची भेट घ्यावी. उपचाराबाबत डॉक्टरांशी सल्लामसलत करावे.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )