Laparoscopic Surgery : लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे काय? कधी अन् का केली जाते?
लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे.
मुंबई : लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने ओटीपोटामध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया. आधीच्या काळात पोट उघडून शस्त्रक्रिया कराव्या लागत होत्या. त्यामुळे रुग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. तसेच जखमा भरुन यायला वेळ लागायचा. परिणामी रुग्णालयात जास्त दिवस रहाव लागत होते. पण आता लॅप्रोस्कोपीक तंत्रज्ञानामुळे खूप फरक पडला आहे. लॅप्रोस्कोपीक (दुर्बिणीद्वारे) शस्त्रक्रियेमुळे ओटीपोटीला कमी छेद करावा लागत असल्याने वेदना कमी होतात. रुग्ण लवकर घरी जाऊन काही दिवसांतच ऑफिसला पूर्वीप्रमाणे जाऊ शकतो. त्यामुळे ही लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया उपयुक्त ठरत असल्याचं मत बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी केलं आहे.
लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. शरीरावर मोठे छेद न करता केवळ दोन ते तीन छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. हे छेद एक ते तीन सेंटिमीटरचे असतात. लेप्रोस्कोप हा एक लांब आणि पातळ नलिकेसारखा असतो. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि उच्च-रिझोल्युशन असलेला कॅमेरा असतो. पोटावर लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घातली जातात. या साधनांच्या आणि पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात. लॅपरोस्कोपीमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातील अवयवांची खुली शस्त्रक्रिया न करताही प्रत्यक्ष तपासणी करता येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्या डॉक्टरांना बायोप्सी (पुढील तपासणीसाठी) नमुने देखील घेता येतात.
लॅप्रोस्कोपी का केली जाते?
लॅप्रोस्कोपी बहुतेक वेळा पोटातील किंवा ओटीपोटातील वेदनांचा स्रोत ओळखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जाते. नॉन-इन्व्हेसिव्ह पद्धती जेव्हा निदान करण्यास अक्षम असतात तेव्हा सहसा लॅप्रोस्कोपी केली जाते.
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कधी केली जाते?
जगभरात सध्या रुग्णावर उपचार करण्यासाठी लॅप्रोस्कोपीक तंत्राचा वापर केला जातो. लॅप्रोस्कोपीक प्रक्रियेद्वारे आता बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इनगिनल हर्निया, हेपेटोबिलरी, स्वादुपिंडाचा आजार, स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. याशिवाय कोलोरेक्टल कॅन्सर, जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर यांसारख्या इतर अवयवांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पटकन आराम मिळू शकतो. परंतु, प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊन लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया करावी का याबाबत डॉक्टर ठरवतात.
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कशी केली जाते?
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया ही सामान्य भूल देऊन केली जाते. या पोटाला 3 ते 4 सेंटिमीटरचा छेद केला जातो. त्यानंतर ओटीपोटीत गॅस पंप करण्यासाठी वापरण्यात येणारी ट्यूब टाकली जाते. याशिवाय कॅमेरा मार्फत ओटीपोटीतील दृश्य पाहण्यास डॉक्टरांना मदत मिळते.
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेचे काही फायदे
- शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा रक्त्तस्त्राव कमी होतो.
- फुफ्फुसाचे कार्य अधिक चांगले होते.
- आतड्यांच कार्य योग्यपद्धतीने चालते.
- शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना जाणवतात.
- जखम लवकर भरुन येते.
- शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज भासत नाही.
- रुग्णाच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होऊन तो दैनंदिन काम करु शकतो.
- ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी असते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )