Monkeypox: अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार, हा आजार किती धोकादायक, कसा बचाव कराल?
Monkeypox : यूके, यूएस, कॅनडासह जगातील अनेक देशांमध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सचे 92 रुग्ण आढळले आहेत. हा आजार किती धोकादायक आहे? यापासून बचाव कसा कराल? हे जाणून घेऊया
Monkeypox : कोरोना विषाणूच्या संसर्गातून जग अद्याप पूर्णपणे बाहेर आलेलं नसताना नवीन आजाराचा फैलाव सुरु झाला आहे. मंकीपॉक्स नावाचा आजार अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. WHO ने याबाबत अलर्ट जारी केला आहे. WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जगातील अनेक देशांमध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सचे 92 रुग्ण आढळले आहेत. यासोबतच 28 नवीन संशयित रुग्णही आढळून आले आहेत. त्याचवेळी, संयुक्त राष्ट्रांच्या एका यंत्रणेने सांगितलं की, "मंकीपॉक्सचे आणखी रुग्ण पुढे येऊ शकतात. कारण या रोगाचा संसर्ग त्या देशांमध्ये झपाट्याने होत आहे, जिथे हा रोग सहसा अस्तित्त्वात नव्हता."
दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, काही देशांमध्ये मंकीपॉक्स हा चिंतेचा विषय असला तरी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेमध्ये हा रोग सामान्य विषाणूजन्य संसर्गाप्रमाणे आहे. जो एक साधा आजार आहे. अशा परिस्थितीत हे देश जगातील इतर देशांना मंकीपॉक्सपासून बचाव करण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी मदत करु शकतात.
हा रोग किती धोकादायक?
अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या आजाराचा धोका सध्या फारसा जास्त नाही. मंकीपॉक्स हा एक साधा विषाणू आहे. त्यामुळे लोकांना ताप, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. यासोबतच मंकीपॉक्सचे लक्षण म्हणजे रुग्णाच्या हातपायांवर पुरळ येणे. हा देवी रोगाचा प्रकार आहे. मंकीपॉक्सचा त्रास असलेले रुग्ण साधारणपणे दोन ते चार आठवड्यांमध्ये पूर्णत: बरे होतात. या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण 1 टक्के आहे.
या रोगाचा प्रसार फारसा जास्त नाही. कोविड-19 चा संसर्ग ज्या वेगाने होतो त्या तुलनेत या विषाणूचा फारच कमी लोकांना संसर्ग होतो, असं अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ज्यांच्या शरीरावर पुरळ आलं आहे अशा लोकांच्या संपर्कात आल्याने मंकीपॉक्स पसरत आहे, असं या आजाराशी संबंधित अलीकडील सर्व प्रकरणांमध्ये अनेकदा असं दिसून आलं आहे.
मंकीपॉक्स विषाणू किती वेगाने पसरतो?
मॅसॅच्युसेट्स हॉस्पिटलचे डॉ. मार्टिन हिर्श म्हणतात की, "कोविड-19 मुळे लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. परंतु मंकीपॉक्सच्या बाबतीत असा कोणताही धोका नाही. हा फारसा जीवघेणा आजार नाही. परंतु या आजाराची लक्षणे दिसतील त्यावेळी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यावर ताबडतोब उपचार करा." डब्ल्यूएचओचे डेव्हिड हेमन यांनी सांगितलं की, मंकीपॉक्सने पीडित व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.
आरोग्य तज्ज्ञ काळजीत का?
मंकीपॉक्सच्या आतापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण अशा देशांमध्ये आहेत जिथे हा आजार कधीच नव्हता. हीच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत हा विषाणू म्युटेट झाला आहे की नाही हे तपासलं जात आहे. आतापर्यंत, यूके, यूएस, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर या देशांमध्ये यापूर्वी असा आजार नव्हता, असं डब्लूएचओने म्हटलं. एवढंच नाही तर अमेरिकेत आणखी प्रकरणं समोर येऊ शकतात. युरोप आणि इतर देशांमध्ये सण, पार्ट्या आणि सुट्ट्यांमधील गर्दी त्यामुळे या रोगाचा संसर्ग होऊ शकतो, अशीही चिंता डब्लूएचओच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोक संसर्ग कसा टाळू शकतात?
ब्रिटनमध्ये या आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देवी रोगासाठी जी लस दिली जाते, तीच लस या कर्मचाऱ्यांना सध्या दिली जात आहे. मंकीपॉक्सपासून बचाव करण्यासाठीही हे औषध प्रभावी असल्याचं बोललं जात आहे. "स्ट्रॅटेजिक नॅशनल स्टॉकपाईल (SNS) मध्ये पुरेशी देवीची लस आहे. यामुळे देशातील सगळ्या नागरिकांचं लसीकरण होऊ शकतं," असं यूके सरकारने सांगितलं. तर यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "देवी रोगासाठी असलेली अँटीव्हायरल औषधे काही परिस्थितींमध्ये मंकीपॉक्सवर उपचार करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकतात."
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )