Navratri 2023: नवरात्रीत तुमचाही उपवास आहे? मग उपवासानिमित्त घरच्या घरी बनवा भगरीचे धिरडे
Navratri 2023: नवरात्रीत नऊ दिवस उपवासाचा फराळ काय बनवायचा, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना? तर आज जाणून घ्या एक सोपी भगरीच्या धिरड्याची रेसिपी...
Navratri 2023: हिंदू धर्मात नवरात्रीला (Navratri 2023) विशेष महत्त्व आहे. अनेक जण नवरात्रौत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवीचा हा उत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला असून अनेकांचे उपवास देखील सुरू होतील. नऊ दिवस चालणाऱ्या या उपवासादरम्यान शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत तुम्ही बटाटे, साबुदणा, भगरीपासून बनलेल्या पदार्थांचं सेवन करू शकता. तर आज उपवासासाठीची एक खास रेसिपी पाहूया, जी चवीस रुचकर आहे आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी देखील देईल. या उपवसाला तुम्ही झटपट बनणारे भगरीचे धिरडे ट्राय करू शकता. पण ते कसे बनवायचे? त्यासाठीची रेसिपी जाणून घेऊया.
भगरीचं धिरडं बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- 2 उकडलेले बटाटे
- 1 वाटी भगर
- पाव वाटी साबुदाणा
- अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
- 4 ते 5 हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
भगरीचं धिरडं बनवण्याची कृती
- सर्वप्रथम साफ केलेली 1 वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा एका भांड्यात घ्या.
- भगर आणि साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- आता अर्ध्या तासासाठी थोडं पाणी टाकून हे दोन्ही चांगलं भिजू द्या.
- यानंतर बटाटे उकडून घ्या आणि सालं काढून चांगले कुस्करुन घ्या
- आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट करून घ्या.
- मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वाटून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या.
- अर्ध्या तासानंतर भिजलेली भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये बारीर करुन घ्या.
- डोसा बनवण्यासाठी जसं पीठ लागतं, अगदी तितकं हे मिश्रण बारीक करुन घ्या.
- आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
- आता या मिश्रणात शेंगदाण्याचा कुट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका.
- कुस्करलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करा.
- गरजेप्रमाणे थोडं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित तयार करून घ्या.
- बॅटर जास्त घट्टही असू नये किंवा जास्त पातळ देखील असू नये.
- गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा.
- तव्यावर थोडं तेल टाकून पसरवून घ्या.
- तवा चांगला तापल्यावरच त्यावर धिरडं तयार करायला घ्या.
- धिरडं तव्यावर चांगलं पसरवून दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
- गरमागरम भगरीचे धिरडे ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व
नव म्हणजे नऊ आणि नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रुप पालटतो. ऋतू बदलू लागतात. यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात, तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. त्यामुळे ऋतुबदलाचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )