Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी लोकल वेळापत्रक तपासण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai: मुंबईकरांना येत्या दोन दिवसांत मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सुरू असलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम लोकल सेवांवर होणार असून एकूण 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरांतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आज- उद्या कांदिवली स्थानक परिसरात मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, कांदिवली-बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाच्या उभारणीचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी 20 डिसेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेपर्यंत जलद मार्गांवर मोठा ब्लॉक असणार आहे. विशेषतः कांदिवली स्थानक परिसरात पायाभूत सुविधांच्या कामासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कुठल्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार?
मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर, तर रात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत अप मार्गावरील 46 आणि डाऊन मार्गावरील 47 अशा एकूण 93 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय बुधवारी दिवसभरात अप मार्गावरील 63 आणि डाऊन मार्गावरील 59, अशा एकूण 122 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत.
प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता
लोकल रद्द झाल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. अनेक प्रवाशांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागणार असून स्थानकांवरही गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी लोकल वेळापत्रक तपासण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सहावा मार्ग सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अधिक सुलभ होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, तोपर्यंत या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे.























