Health Tips : हिवाळ्यात वाढतोय 'स्ट्रोक' चा धोका; विशेष काळजी घेण्याचा तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला
Health Tips : तापमानात घट झाल्याने उच्च रक्तदाब, रक्ताच्या गुठळ्या अशा समस्या आढळून येतात. डॉक्टरांना, विशेषतः उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग असलेल्यांना, थंडीच्या काळात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Health Tips : जसे हिवाळ्यात (Winter) श्वसन संसर्ग आणि हृदयरोग वाढतात, तसेच ब्रेन स्ट्रोकच्या (Brain Stroke) प्रकरणांमध्येही मोठ्या संख्येने वाढ होते. तापमान कमी झाल्यामुळे शरीरात रक्त गोठण्याची शक्यता अधिक असते आणि शरीराच्या हालचालीवर त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत रक्तप्रवाह करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात आणि मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. त्यामुळे हृदय आणि मेंदूला पुरेसे रक्त मिळत नाही. ऑक्सिजन आणि रक्ताच्या प्रवाहात अडथळा आल्याने रक्ताची गुठळी तयार होते आणि पक्षाघाताचा (ब्रेन स्ट्रोक) धोका वाढतो.
तापमानात घट झाल्याने उच्च रक्तदाब, रक्ताच्या गुठळ्या, निर्जलीकरण होणे अशा समस्या आढळून येतात. डॉक्टरांना, विशेषतः उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग असलेल्यांना, थंडीच्या काळात विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार
ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार असतात, पहिला म्हणजे इस्केमिक ब्रेन स्ट्रोक आहे. यामध्ये मेंदूच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे त्यामुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे या पेशी वेगाने नष्ट होऊ लागतात. दुसऱ्या स्थितीत रक्तस्रावाचा झटका येतो. यामध्ये मेंदूची रक्तवाहिनी फुटल्याने रक्तस्त्राव होऊन अतंर्गत भागात रक्त साचते. हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या वाढते कारण थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि रक्त गोठते. व्यायामाचा अभाव, डिहायड्रेशन आणि प्रदूषणामुळे याचा धोका अधिक वाढतो. हिवाळ्यातील डिहायड्रेशनकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. परंतु सौम्य डिहायड्रेशन देखील रक्ताच्या गुठळ्या निर्माण करू शकते, ज्यामुळे गोठण्याची शक्यता वाढते. फ्लू आणि न्यूमोनियासारख्या संसर्गामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. ज्यांना आधीच हृदयरोग, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो. हिवाळ्यात 30 ते 65 वयोगटातील लोकांमध्ये स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये 10% वाढ होते. जर कोणाला अचानक अशक्तपणा, चेहरा अचानक वाकडा होणे किंवा बोलताना त्रास होणे यासारखी सुरुवातीची लक्षणे दिसली तर त्यांनी ताबडतोब रुग्णालयात जावे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पीटलचे न्यूरोसर्जन (मेंदू आणि मणका) डॉ. सुनील कुट्टी यांनी व्यक्त केली.
डॉ. सुनील कुट्टी पुढे सांगतात की, सीटी आणि एमआरआय स्कॅनसारख्या न्यूरोइमेजिंगमुळे डॉक्टरांना स्ट्रोकचा प्रकार आणि स्थान ओळखण्यास मदत होते, ज्यामुळे जलद आणि अचूक उपचार शक्य होतात. इस्केमिक स्ट्रोकमध्ये रक्त प्रवाह सुरू झाल्यानंतर काही तासांत दिला तर रक्तस्त्राव पुनर्संचयित करण्यासाठी विशेष औषधांचा वापर केला जातो. यामध्ये क्लॉट-बस्टिंग ड्रग्ज (टीपीए सारखी) वापरले जातात. उपचार करताना, स्ट्रोकच्या स्थितीनुसार, डॉक्टर सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या चाचण्या करून घेतात. एखाद्या प्रकरणामध्ये रक्ताची गुठळी तयार झाली असेल तर, त्यावर औषधांनी उपचार करता येऊ शकतो. पण धमनी फुटल्यामुळे मेंदूच्या कोणत्याही भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या असतील तर शस्त्रक्रिया हाच पर्याय ठरतो. एंडोव्हस्कुलर थेरपी ही मिनीमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया, डॉक्टरांना कॅथेटर वापरून क्लॉट काढून टाकण्यास मदत करते. ब्रेन स्ट्रोकची लक्षणे जाणवल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात नेणे अवश्यक असते. हा त्रास झाल्यावर पहिले तीन ते चार तास (गोल्डन अवर्स) हे उत्तम उपचारांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरतात.
ब्रेन स्ट्रोकवर 'हा' उपाय फायदेशीर
स्ट्रोक प्रतिबंधाकरिता त्याबाबत जागरूकता आणि नियमित आरोग्य तपासणीने गरजेची आहे. वेळोवेळी रक्तदाब तपासणे, सक्रिय जीवनशैली बाळगणे आणि हायड्रेशन राखणे यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. धूम्रपान टाळणे, मद्यपानाचे सेवन मर्यादित करणे आणि शरीराचे तापमान सामान्य राखण्यासाठी उबदार कपडे घालणे गरजेचे आहे.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं
हिवाळ्यात तापमानात घट झाल्याने रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. बरेचजण हिवाळ्यात व्यायामाचा कंटाळा करतात, पाणी कमी पितात या सर्वांमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. सांकेतिक भाषेत स्ट्रोकच्या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. याचा अर्थ (बॅलेन्स - संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ). वरिल लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. वेळीच उपचारान् अमुल्य जीव वाचू शकतो आणि अर्धांगवायू किंवा मृत्यूसारखे दीर्घकालीन अपंगत्व टाळता येते. गोल्डन अवरमध्ये (पहिल्या 60 मिनिटांत) रुग्णालयात पोहोचल्याने मृत्यूचा धोका टाळता येतो आणि दीर्घकालीन अपंगत्व टाळता येते. रक्ताच्या गुठळ्या दूर करण्यासाठी औषधं, थ्रोम्बेक्टॉमी आणि रिहॅबिलेशन यासारख्या उपचारांमुळे शारीरीक हालचाल आणि बोलताना येणारा अडथळा दूर करता येऊ शकतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवून, शरीर सक्रिय राखुन तसेच निरोगी आहाराच्या सेवनाने स्ट्रोकचा धोका टाळता येतो.धूम्रपान टाळणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, जवळजवळ 80% स्ट्रोक हा त्याबाबत असलेली जागरूकता आणि वेळीच वैद्यकीय उपचारान् रोखता येतो अशी प्रतिक्रिया इंडियन स्ट्रोक असोसिएशन (ISA) चे सचिव, स्ट्रोक स्पेशलिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. अरविंद शर्मा यांनी व्यक्त केली.
- डॉ. सुनील कुट्टी नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पीटलचे न्यूरोसर्जन (मेंदू आणि मणका)
- डॉ. अरविंद शर्मा इंडियन स्ट्रोक असोसिएशन (ISA) चे सचिव, स्ट्रोक स्पेशलिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट
हे ही वाचा :
रक्तातील साखर वाढली की डोळ्यांवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























