Health Tips : UTI म्हणजे काय? लक्षणे कोणती? शालेय मुलांमध्ये स्वच्छतेविषयी सवय कशी लावता येईल?
Health News : शालेय मुलांमध्ये शौचालयासंबंधी स्वच्छतेचा प्रचार करणे आणि यूटीआय समस्येबद्दल माहिती देणे ही काळाची गरज आहे
Health Tips : युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) हे सामान्य जिवाणू संक्रमण आहेत जे लहान मुलांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करु शकतात. यावर वेळीच न केल्यास ते गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरु शकतात. शालेय मुलांमध्ये शौचालयासंबंधी स्वच्छतेचा प्रचार करणे आणि यूटीआय (Urinary Tract Infection) समस्येबद्दल माहिती देणे ही काळाची गरज आहे. या लेखात पुण्यातील खराडी इथल्या मदरहूड रुग्णालयातील निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी यूटीआय प्रतिबंध आणि जागरुकतेवर लक्ष केंद्रित करुन शाळांमध्ये स्वच्छतेविषयी शिक्षण देण्याचे महत्त्व सांगितले आहे.
मुलांमधील यूटीआय समजून घेणे
जेव्हा जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा यूटीआय संसर्ग उद्भवतो, ज्यामुळे मूत्राशय किंवा मूत्रपिंडासारख्या विविध भागांमध्ये संक्रमण होते. मुलांमध्ये यूटीआय संसर्ग अनेक लक्षणांसह दिसून येतात.
- वारंवार मूत्रविसर्जनाची भावना होणे
- लघवी करताना वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे
- लघवी न रोखता येणे
- पोटदुखी
- ताप
- दुर्गंधीयुक्त मूत्र
- अंथरुण ओले करणे
मुलांमधील युटीआय संसर्गावर उपचार न केल्यास भविष्यात मूत्रपिंड संक्रमणासारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते. या संक्रमणांमुळे मूत्रपिंडाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
मुलांमध्ये स्वच्छतेविषयी सवय कशी लावता येईल?
1. हात धुणे : वारंवार हात धुणे हे यूटीआय संरक्षणाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाचा वापर करुन हात पाण्याने स्वच्छ धुवावे. हाताची स्वच्छता हे मूत्रमार्गात जीवाणूंचा प्रसार रोखण्यास मदत करते.
2. पुसण्याचे तंत्र : मुलींना शौचालयाचा वापर केल्यानंतर वरुन खालच्या दिशेने स्वच्छतेचे तंत्र शिकवले गेले पाहिजे. असे न केल्यास हे गुदद्वारातील बॅक्टेरियांना मूत्रमार्गात प्रवेश करण्यास आणि संक्रमणास कारणीभूत ठरु शकते.
3. बाथरुम ब्रेक द्या : मुलांना लघवी करण्याची गरज भासत नसली तरीही त्यांना नियमित बाथरुम ब्रेक घेण्यास प्रोत्साहन द्या. हे त्यांचे मूत्राशय वेळोवेळी रिकामे करण्यास मदत करते तसेच जिवाणू तयार होण्याचा धोका कमी करते.
4. हायड्रेशन : मूत्रमार्गाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शाळांनी मुलांना दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
5. योग्य वातावरण तयार करा : शाळांनी असे वातावरण तयार केले पाहिजे जेथे मुलांना लघवीशी संबंधित कोणत्याही अस्वस्थता किंवा लक्षणांवर चर्चा करण्यास सोयीस्कर वाटेल. लक्षणे दिसताच वेळीच निदान आणि उपचार करणे शक्य होते.
यूटीआयबाबात शिक्षण महत्त्वाचे
शालेय वयाच्या मुलांसाठी यूटीआय आणि योग्य शौचालय स्वच्छताबद्दलचे शिक्षण महत्त्वाचे आहे.
1. यूटीआय प्रतिबंध : मुलांना वेळोवेळी शौचालय स्वच्छतेबाबत माहिती देणे तसेच त्यांना यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी व त्यानुसार उपाययोजना करण्यास सक्षम करते. या पद्धतींचे ज्ञान हा संक्रमणाचा धोका कमी करु शकते.
2. वेळीच निदान : शिक्षण मुलांना यूटीआयची प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे ओळखण्यास मदत करू शकते. जेव्हा मुलांना या लक्षणांची जाणीव होते, तेव्हा ते त्यांच्या पालकांना सावध करू शकतात, ज्यामुळे वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकतात.
3. गैरसमजुती दूर होतील : शाळांमधील UTI आणि शौचालयाच्या स्वच्छतेबद्दल खुले संभाषण या विषयांशी संबंधित कोणत्याही गैरसमजुती कमी करण्यास मदत करु शकते. मुलांनी त्यांच्या आरोग्याविषयी प्रौढांसोबत खुली चर्चा करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
4. भविष्यातील धोका टाळणे शक्य : बालपणात शिकलेल्या शौचालय स्वच्छतेच्या पद्धती आणि यूटीआयबद्दल जागरुकता ही धोका टाळण्यास मदत करते
5. मुलींना सशक्त बनवणे : मुलींना, यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी योनी मार्गाची स्वच्छता ही वरुन खालच्या दिशेने करण्याबाबत जागरुक केले गेले पाहिजे.
शाळांमध्ये शौचालय स्वच्छता शिक्षण, यूटीआय प्रतिबंध आणि जागरूकता यावर विशेष लक्ष केंद्रित करुन, मुलांच्या आरोग्य शिक्षणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीचा वापर करुन हात धुणे, योनीमार्गाची स्वच्छता राखणे आणि शरीर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे. शालेय मुलांना बाथरुम ब्रेक देत त्यावेळी मूत्रमार्गाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि पुरेशी माहिती देणे गरजेचे आहे. शाळांमध्ये युटीआयबद्दल खुली चर्चा केली गेली पाहिजे. त्यामुळे मुलांना कोणतीही अस्वस्थता किंवा लक्षणे त्याचे वेळीच निदान आणि उपचार शक्य होतील. हे प्रयत्न शालेय वयाच्या मुलांच्या सर्वांगीण विकास आणि आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येईल.
(विशेष सूचना : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. औषधोपचार, आरोग्य विषयक सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )