Health : लोक हमखास दुर्लक्ष करतात! 'या' गोष्टींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, 'अशी' काळजी घ्या..
Health : सामान्यतः लोक याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे आरोग्यास हानी होण्याचाही धोका आहे.
Health : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अयोग्य आहार अशा विविध गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यापैकीच एक म्हणजे हृदयविकार.. हृदयविकारामुळे जगभरात दरवर्षी लाखो मृत्यू होतात. या गंभीर समस्येला तरुणही बळी पडत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जीवनशैली आणि जंक फूडचे अतिसेवन, आहाराच्या अयोग्य पद्धती हे हृदयविकाराचे मुख्य कारण मानले जात असले तरी, आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक घटना घडतात की, ज्यामुळे हृदयाचे आजार आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण तुम्हाला माहित आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राग, दुःख आणि तणाव यासारख्या परिस्थितींचाही हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. सामान्यतः लोक याकडे लक्ष देत नाहीत, यामुळे आरोग्यास हानी होण्याचा धोका आहे. जाणून घेऊया हृदयासाठी कोणती परिस्थिती धोकादायक मानली जाते? ज्याबद्दल प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
हृदयरोगाचा धोका
हृदयरोग तज्ज्ञ म्हणतात की, केवळ योग्य आहार आणि दैनंदिन दिनचर्या राखणे महत्वाचे नाही तर प्रत्येकाने दैनंदिन जीवनातील इतर काही परिस्थितींबद्दल देखील काळजी घेणे आवश्यक आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की, झोपेची समस्या, मायग्रेन, वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणे आणि जास्त ताण देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही तुम्ही गंभीर समस्यांना बळी पडू शकता, त्यामुळे त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
उच्च तीव्रतेचा व्यायाम देखील हानिकारक
तंदुरुस्त राहण्यासाठी आणि शरीर सक्रिय ठेवण्यासाठी, सर्व लोकांना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही जास्त तीव्रतेने किंवा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला तर त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. सुमारे 6% हृदयविकाराचा झटका जास्त व्यायामामुळे येतो. तर तीव्र पातळीच्या व्यायामामुळे देखील उच्च रक्तदाबाचा धोका असतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आणि जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.
झोपेची कमतरता देखील धोकादायक
ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना अनेक गंभीर आणि विविध आजारांचा धोका असू शकतो. तुम्हाला नियमितपणे पुरेशी झोप न मिळाल्यास, तुम्हाला चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो, तर दीर्घकाळ झोपेच्या समस्यांमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढू शकतो. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक सहसा रात्री 6 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 6 ते 8 तास झोपलेल्या लोकांपेक्षा दुप्पट असते.
हृदयाच्या आरोग्यावर वायू प्रदूषणाचा परिणाम
व्यायाम आणि झोपेशिवाय वायू प्रदूषणाचा हृदयाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. जास्त प्रदूषण असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे. जे लोक नियमितपणे प्रदूषित हवेचा श्वास घेतात, त्यांना रक्तवाहिन्या अडकून हृदयविकार होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे रहदारी आणि प्रदूषणात बसणे विशेषतः धोकादायक ठरू शकते. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गुंतागुंतीबाबतही सावध राहणे गरजेचे आहे.
हेही वाचा:
Health : मोठ्या सुट्टीनंतर येतो कामाचा कंटाळा? काही करण्याची इच्छा होत नाही? 'अशा' प्रकारे दूर करा आळस
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )