Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर काय करावं? रेबीजची लक्षणं कोणती? सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या
First Aid after Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर काय करावं? रेबीजची लक्षणं काय आहेत? रेबीज केव्हा होतो? हे आणि यासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाऊन घ्या.
मुंबई : सध्या कुत्रा चावल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अलिकडेच कुत्रा चावल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. या मुलाला कुत्रा चावला मात्र, त्याने घाबरुन घरच्यापासून सुमारे महिनाभर ही बाब लपवून ठेवली. मात्र, त्यानंतर रेबीज होऊन या मुलाचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कुत्रा चावल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे हे सविस्तर जाणून घ्या.
कुत्रा चावल्यानंतर काय करावं?
कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी कुत्रा चावलेल्या जागेवर लगेचच निर्जंतुक पट्टी बांधावी आणि लगेच रुग्णाला जवळच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी न्यावे.
कुत्रा चावल्यानंतर प्रथमोपचार कोणता?
कुत्रा चावला असल्यास रेबीज टाळण्यासाठी प्रथमोपचार म्हणून जखम 15 मिनिटे धुवावी आणि त्यावर पट्टी बांधावी. यानंतर लगेच संबंधित व्यक्तीला जवळच्या डॉक्टरांना दाखवून त्यावर योग्य उपचार करावेत.
कुत्रा चावल्यावर घरगुती उपाय कोणता?
कुत्रा चावल्यास कोणताही घरगुती उपाय करणं धोकादायक ठरू शकतं. कुत्रा चावल्यास कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता आणि बाबा-बुबांच्या नादी न लागता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं, योग्य आहे. कुत्रा चावल्यावर घरगुती उपाय करणं महागात पडू शकतं, यामुळे जीवही जाऊ शकतो. त्यामुळे वेळीस डॉक्टरांकडून उपचार घेणं योग्य ठरेल.
पाळीव कुत्रा चावल्यास किंवा ओरबाडल्यास रेबीज होऊ शकतो का?
जर तुम्ही पाळीव कुत्र्याला लस दिली असेल तर, कुत्रा चावल्यास किंवा ओरबडल्यास रेबीस होण्याची शक्यता फार कमी आहे. पण, तरीही पाळी कुत्रा चावल्यास किंवा ओरबाडल्यास याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कोणताही कुत्रा चावल्याने रेबीज होतो का?
रेबीजची लागण झालेल्या कुत्र्याने आपल्याला चावल्यास रेबीज होऊ शकतो. आजकाल लोक पाळीव कुत्र्यांचं अगोदर लसीकरण करून घेतात, त्यामुळे ही शक्यता कमी असते. पण भटका कुत्रा चावल्यास रेबीज होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, कुत्र्याला रेबीज झाला आहे की नाही, हे माहित नसल्यामुळे कोणताही कुत्रा चावल्यास निष्काळजीपणा न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
कुत्रा चावल्यानंतर किती तासांच्या आत इंजेक्शन घ्यावं?
कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणं फार महत्वाचं आहे. कुत्रा चावल्यास पाच इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पहिले इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत, दुसरं इंजेक्शन तिसऱ्या दिवशी, तिसरं इंजेक्शन सातव्या दिवशी आणि चौथं इंजेक्शन 14 व्या दिवशी आणि शेवटचं म्हणजेच पाचवं इंजेक्शन 28 व्या दिवशी दिलं जातं.
रेबीजची लक्षणे कोणती?
शरीरातील स्नायू दुखणे, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, मानसिक संतुलन बिघडणे ही रेबीजची लक्षणे आहेत.
रेबीजची लक्षणे किती दिवसांनी दिसतात?
साधारण एक ते तीन महिन्यांत तुम्हाला रेबीजची लक्षणे दिसू लागतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Uttar Pradesh: भीतीने कुत्रा चावल्याचं घरच्यांपासून लपवलं; दीड महिन्यानंतर रेबिजमुळे मुलाचा मृत्यू, वडिलांच्या मिठीतच सोडले प्राण
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )