(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तापाबरोबर 'ही' समस्या जाणवत असेल तर हलक्यात घेऊ नका; डेंग्यूची असू शकतात लक्षणं
Health Tips : डेंग्यू हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे, ज्याच्या कारणास्तव हा रोग होतो.
Health Tips : साधारणत: ताप, सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गाची लक्षणं जाणवत असतील तर आपण यांना साथीचे आजार म्हणतो आणि हलक्यात घेतो. मात्र, अनेकदा आपल्याला येणारा ताप हा सर्वसामान्य ताप नसून याबरोबर काही गंभीर लक्षणेही दिसतात. जसे की, तापाबरोबरच शरीरात तीव्र वेदना जाणवणे, उलट्या-जुलाब होणे, त्वचा कोरडी होणे, डोळे लाल होणे, तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू लागली, तर तो डेंग्यू विषाणूचा संसर्ग असू शकतो. डेंग्यू हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. एडिस डासामुळे हा संसर्गजन्य रोग पसरतो. ज्या भागात पाणी साचून राहते आणि डासांची उत्पत्ती होते अशा भागात हा आजार अधिक आढळतो. यावर वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातकही ठरू शकतो. त्यामुळे तापाबरोबरच अतिरिक्त लक्षणांकडेही ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे.
'ही' लक्षणे तापाबरोबर दिसू शकतात
- शरीरात तीव्र वेदना - तापाबरोबरच संपूर्ण शरीरात किंवा डोक्यात, पाठीत आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर ही चिंतेची बाब आहे.
- उलट्या आणि जुलाब – सततच्या उलट्या आणि जुलाब हे डेंग्यूच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.
- त्वचेवर लाल पुरळ किंवा कोरडेपणा - हे डेंग्यू सारख्या आजारांमध्ये होते.
- डोळे लाल होणे आणि जळजळ होणे हे डेंग्यू विषाणू संसर्गाचे लक्षण असू शकते.
- गंभीर डोकेदुखी - मायग्रेनसारखी डोकेदुखी डेंग्यू विषाणूजन्य तापाचे लक्षण असू शकते.
- चक्कर येणे – अशक्तपणा आणि चक्कर येणे ही डेंग्यूसारख्या आजाराची लक्षणे आहेत.
यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास हलक्यात घेऊ नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डेंग्यू कसा होतो हे जाणून घ्या
डेंग्यूचा विषाणू एडिस नावाच्या डासामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. एडीस डासाची ही मादी प्रजाती आहे जी मानवी रक्ताची शिकार करते. एडीस डासाची मादी डेंग्यूच्या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त शोषून घेते तेव्हा हा विषाणू डासाच्या शरीरात प्रवेश करतो. मग तोच डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यावर डेंग्यूचे विषाणू त्याच्या लाळेतून त्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतात आणि डेंग्यूचा आजार उद्भवतो. त्यामुळे डेंग्यू टाळण्यासाठी डास चावण्यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. घराभोवती डासांची उत्पत्ती होण्यापासून थांबवले पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :