Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका
Health Tips : बहुतेक स्ट्रीटजवळ मिळणारे हे पदार्थ खर्च वाचविण्यासाठी एकाच तेलात वारंवार तळले जातात. पण, हेच तेल वारंवार गरम-थंड करून पुन्हा वापरल्याने त्याची गुणवत्ता कमी होते.
Health Tips : स्ट्रीट फूडचा (Street Food) उल्लेख करताच आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी चाटचे पदार्थ, भजी, फ्रॅंकी, चायनीज हे पदार्थ दिसू लागतात. खरंतर पोटाची भूक आणि तोंडाची चव भागविणारे हे पदार्थ सर्वांनाच आवडतात. पण, जीभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ ज्या तेलापासून बनवले जातात हे तेल तुमच्या आरोग्यसाठी किती घातक आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बहुतेक स्ट्रीटजवळ मिळणारे हे पदार्थ खर्च वाचविण्यासाठी एकाच तेलात वारंवार तळले जातात. पण, हेच तेल वारंवार गरम-थंड करून पुन्हा वापरल्याने त्याची गुणवत्ता कमी होते. आणि हेच आपल्या आरोग्यासाठी फार घातक आहे.
स्ट्रीट फूड बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल बहुतेक वेळा रिफाइन्ड आणि अत्यंत प्रक्रिया केलेले असते. हे तेल वारंवार वापरल्यानंतर त्यांची गुणवत्ता कमी होते. तसेच, अनेकदा या तेलावर विविध केमिकल्स मिसळून त्यावर प्रक्रिया केली जाते. जेणेकरून ते लवकर खराब होणार नाहीत आणि जास्त काळ टिकून राहतील.
हे तेल वापरल्याने शरीराला कोणते नुकसान होऊ शकते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
हृदयविकाराचा धोका
स्ट्रीट फूड बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांमध्ये ट्रान्स फॅट नावाचे हानिकारक फॅट जास्त प्रमाणात असते. ट्रान्स फॅट हे फॅट आहे जे आपल्या शरीराचे आतून नुकसान करते. हे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त पटीने वाढतो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका देखील लक्षणीय वाढतो.
कर्करोगाचा धोका
संशोधनानुसार, तेल वारंवार गरम केल्याने त्यात एक हानिकारक रसायन तयार होते ज्याला अल्डीहाईड म्हणतात. हा एक प्रकारचा विषारी पदार्थ आहे जो आपल्या पेशींना नुकसान पोहोचवतो. अशा तेलाच्या नियमित सेवनाने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा, विशेषत: फुफ्फुसाचा आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वारंवार गरम केलेले तेल वापरू नका. जेवणासाठी नेहमी ताजे आणि शुद्ध तेल वापरा.
ताण वाढतो
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा तेल वारंवार गरम केले जाते तेव्हा त्यात फ्री रॅडिकल्स नावाचे हानिकारक पदार्थ तयार होतात. हे आपल्या रक्त पेशींचे नुकसान करतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढवतात. यामुळे तणाव, चिंता यांसारख्या मानसिक समस्याही वाढतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Hair Care Tips : पांढरे केस तोडल्याने काळे केसही पांढरे होतात? खरं की खोटं? जाणून घ्या यामागचं सत्य