Health Tips : रक्तगटानुसारच तुमचा आहार हवा; निरोगीच नाही तर उत्साहीदेखील राहाल...
Health Tips : बहुतेक लोक स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या आहार योजनांचे पालन करतात.
Health Tips : या आधुनिक आणि अनहेल्दी जीवनशैलीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. आजकाल तरूणांमध्ये हृदयविकाराचा झटका तसेच पक्षाघाताचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत, आपण पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेणं सर्वात महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्ही गंभीर आजारांपासून सुरक्षित राहाल. बहुतेक लोक स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या आहार योजनांचे पालन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रक्तगटानुसार आहाराचे पालन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होतो. अनेक संशोधनांनुसार, जर तुम्ही तुमच्या रक्तगटानुसार अन्न खाल्ले तर तुमचे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते. याबरोबरच तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो असं सांगण्यात आलं आहे.
रक्तगटाचा आहार म्हणजे काय?
आहारतज्ञांच्या मते तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये? हे तुमच्या रक्तगटावरून कळते. सर्वात आधी, जेव्हा आपण काही खातो तेव्हा रक्तामध्ये चयापचय प्रतिक्रिया होते. हे घडते कारण अन्नामध्ये प्रथिने असतात आणि रक्तामध्ये प्रतिजन असते. रक्तगटानुसार अन्न खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
कोणत्या रक्तगटासाठी कोणता आहार योग्य?
A रक्तगट -
A रक्तगट असलेल्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे त्यांनी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खावेत. तसेच कमी चरबीयुक्त पदार्थ खावेत. A रक्तगट असलेल्या लोकांनी तांदूळ, भोपळा, शेंगदाणे, सोया फूड, बेदाणे, आले आणि मोहरी यांचं सेवन करावं.
B रक्तगट -
B रक्तगट असलेल्या लोकांनी संतुलित आहार पाळावा. या रक्तगटातील भाज्या, मासे, कार्ब्स, दूध आणि दही घ्या. याबरोबरच आहारात भरपूर प्रोटीनयुक्त पदार्थ असले पाहिजेत. तसेच, या रक्तगटाच्या लोकांनी जंक फूड, शेंगदाणे आणि मसूर कमी खावे.
AB रक्तगट -
AB रक्तगट असलेल्या लोकांना निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर त्यांनी मांस, मासे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत. तसेच निरोगी राहण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. AB रक्तगट असलेल्या लोकांनी लाल मांस, मका आणि जड पदार्थ खाणे टाळावे.
O रक्तगट -
O रक्तगट असलेल्या लोकांना ऍलर्जी, ताप आणि एक्जिमा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. या रक्तगटाच्या लोकांनी आपल्या आहारात अधिकाधिक प्रोटीनयुक्त पदार्थ, धान्ये आणि बीन्स खावेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :