Health News : सकाळची सुरूवात चहा, कॉफीने करताय? आताच थांबा, याऐवजी 'हे' 4 ड्रिंक प्या, आजार राहतील दूर!
Health News : हे आरोग्यदायी पेय तुमच्या आरोग्यात बदल घडवून आणतील आणि अनेक आजारांना तुमच्यापासून दूर ठेवतील, जाणून घ्या..
Health News : बहुतेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा (Tea) किंवा कॉफीचा (Coffee) घोट लागतो. त्यांचा दिवस चहा घेतल्या शिवाय सुरूच होत नाही. तुम्हाला माहीत आहे का? फिट राहण्यासाठी दिवसाची सुरुवात करण्याचा हा योग्य मार्ग नव्हे.. बरं का..! कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा दिवस सुरू करता, त्याचा परिणाम दिवसभरातील तुमच्या आरोग्यावर आणि उर्जेच्या पातळीवर होतोय. जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर तुम्ही सकाळी घेत असलेले ड्रिंक हे तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत करते. हे आरोग्यदायी पेय तुमच्या आरोग्यात बदल घडवून आणतील आणि अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. जाणून घ्या..
मोरिंगा ड्रिंक
दिवसाची सुरूवात तुम्हाला चांगली करायचीय तर, मोरिंगा ड्रिंक हे सुपरफूड मानले जाते. कारण त्यात लोह भरपूर आहे. हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. यातून मिळणारे लोह शरीरात चांगले शोषले जाते. हे अँटी-बायोटिक, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-एजिंग आहे. हे ड्रिंक प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते, वजन कमी होते, केस गळणे कमी होते. यामुळे शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर होते. याव्यतिरिक्त, याच्या सेवनाने साखरेची पातळी नियंत्रणात राहते, थायरॉइडचे कार्य सुधारते, संधिवात वेदना आणि पेटके दूर होतात. हे पेय रोज प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चेहऱ्यावर चमक येते.
मोरिंगा ड्रिंक रेसिपी
मोरिंगाची पाने सुकवून पावडर बनवा.
पॅनमध्ये एक कप पाणी आणि अर्धा चमचा मोरिंगा पावडर घालून चांगले उकळवा.
आता गॅस बंद करा आणि चहा गाळून कपमध्ये काढा.
त्यात एक चमचा मध किंवा लिंबाचा रस मिसळून प्या.
मेथी दाणे ड्रिंक
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर भरपूर असते, जे पचन आणि कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी कमी करते. जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या या मसाल्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, मँगनीज आणि जस्त असतात. या बियांपासून बनवलेले पेय रोज प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात, सांधेदुखी कमी होते आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे पेय रोज प्यायल्याने तुमचे वजनही झपाट्याने कमी होते. मेथीचे दाणे त्वचेसाठीही चांगले असतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात. याशिवाय मेथीच्या दाण्यांपासून बनवलेल्या पेयामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे व्हायरल ताप, खोकला आणि सर्दीपासून संरक्षण करतात.
मेथी दाणे ड्रिंक कृती
एक चमचा मेथी दाणे नीट धुवून घ्या.
नंतर एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी हे पाणी प्या आणि दाणे चावून खा.
गिलॉय ड्रिंक
गिलॉयचे फायदे अमृतसारखे आहेत, म्हणून त्याला आयुर्वेदात अमृत म्हणतात. गिलॉयमध्ये दाहक-विरोधी, अँटी-पायरेटिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. हे मेंदूसाठी टॉनिक आहे, तणाव कमी करते आणि स्मरणशक्ती वाढवते. गिलॉयमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बायोटिक, अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-डायबेटिक आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म आढळतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दी, मधुमेह यांसारखे आजार बरे करण्यासाठी ते फायदेशीर आहे. याशिवाय गिलॉय पोटाशी संबंधित समस्या दूर करते.
गिलॉय ड्रिंक रेसिपी
गिलॉय पावडर सकाळी कोमट पाणी आणि मधासोबत घ्या.
कोमट पाण्यात एक चमचा गिलॉय पावडर घाला.
नंतर मध घालून सकाळी प्या.
तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी गिलॉय ज्यूसने करा.
10 मिली गिलॉय रस कोमट पाण्यात मिसळा.
मग ते प्या.
हळद काळी मिरी ड्रिंक
या ड्रिंक मधील कर्क्यूमिन आणि पाइपरिन शरीरातील जळजळ कमी करतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन सुधारते आणि पोटात पेटके कमी करते. हळद आणि काळी मिरी दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे PCOS, ऍसिडिटी आणि ॲनिमियावर उपचार करतात. याशिवाय, हे एक नैसर्गिक वेदनाशामक देखील आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि इन्सुलिनची संवेदनशीलताही सुधारते.
हळद आणि काळी मिरी ड्रिंक कृती
एका भांड्यात 1 ग्लास पाणी गरम करा.
त्यात थोडी हळद आणि 1 चिमूट काळी मिरी पावडर घाला.
थोडा वेळ उकळवा.
आता ते एका ग्लासमध्ये काढा.
थोडे थंड झाल्यावर प्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Gain : ओह..नो..! वजन अचानक वाढतंय? 'या' 4 गोष्टी तपासा, तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती