(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sentinel Tribe: 'हे' जगातील सर्वात रहस्यमय लोक! बाहेरील जगाशी संपर्क ठेवत नाहीत, जाणून घ्या
Sentinel Tribe: आजही ही जमात बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवता, पूर्णपणे अलिप्त राहते. छायाचित्रांद्वारे त्यांची जनगणना दुरूनच केली जाते.
Sentinel Tribe : जगात अनेक विविध प्रकारच्या जमाती राहतात. काही हळूहळू आधुनिक होत आहेत, तर काही अजूनही त्यांच्या परंपरांनुसार जगतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की भारतात अशी एक जमात आहे, ज्याला अजूनही संपूर्ण जग नीट ओळखू शकले नाही. लोकांनी त्यांच्याबद्दल फक्त कथा ऐकल्या आहेत, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच एका रहस्यमय जमातीबद्दल सांगणार आहोत, लोक त्यांना सेंटिनली जमात (Sentinel Tribe) म्हणतात. ही जमात अंदमानच्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर राहते.
पूर्णपणे अलिप्त राहतात
सेंटिनेलीज लोक हे अंदमानच्या उत्तर सेंटिनेल बेटावर राहणारे नेग्रिटो समुदायाचे लोक आहेत. आजही ते बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवता पूर्णपणे अलिप्त राहतात. मात्र, 1991 मध्ये भारत सरकारने या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या आदिवासी समाजाने भारतीय मानववंशशास्त्रज्ञ आणि प्रशासकांच्या टीमकडून काही नारळ घेतले होते. पण हे नारळही या लोकांनी लांबूनच नेले. सेंटिनेलीज लोकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे त्यांच्या छायाचित्रांद्वारे त्यांची जनगणना दुरूनच केली जाते. उत्तर सेंटिनेल बेटावर त्यांची लोकसंख्या 50 ते 100 च्या दरम्यान आहे.
हे लोक काय खातात?
नॉर्थ सेंटिनेल बेटाच्या सर्वेक्षणातून असे दिसून येते की, येथे शेतीचा पुरावा नाही. यासोबतच ही मंडळी समूहाने शिकार करतात. आतापर्यंतच्या संशोधनातून समोर आले आहे की, हे लोक मासे पकडून अन्न मिळवतात, तसेच बेटावर राहणारी वन्य वनस्पती गोळा करून पोट भरतात. सेंटिनेलीज लोकांना भारत सरकारने विशेषत: असुरक्षित आदिवासी गट म्हणून सूचीबद्ध केले आहे.
भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे
या सेंटिनेलीज लोकांच्या जमातीला अंदमान आणि निकोबार बेटांच्या ग्रेट अंदमानीज, ओंग, जरावा आणि शॉम्पेन पीव्हीटीजी म्हणून इतर चार जमातींच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. या सर्व जमातींना अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह (आदिवासी जमातींचे संरक्षण) नियमन, 1956 द्वारे संरक्षण दिले गेले आहे. हा कायदा आदिवासींच्या ताब्यातील पारंपारिक क्षेत्रे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करतो. अधिकारी वगळता इतर कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करतो. यासोबतच या आदिवासींचे फोटो काढणे किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करणे हा गुन्हा आहे.
अनोळखी लोकांना मारणे
अलीकडेच एक ख्रिश्चन मिशनरी या लोकांना बायबलचे धडे शिकवण्यासाठी गेला होता आणि त्यांना ख्रिश्चन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, या सेंटिनेलीज लोकांनी त्याला बाण मारून ठार केले. या लोकांनी यापूर्वीही अनेकदा बाहेरील लोकांवर हल्ले केले आहेत.