Marathi Play : नवी पर्वणी! नाट्यरसिकांसाठी सांगीतिक मेजवानी,गृहीतकांचे आयन दिपवणारे ‘उर्मिलायन’
Marathi Play : उर्मिलायन हे नवं नाटक लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीस येणार आहे.
Marathi Play : मनोरंजनातून काहीतरी चांगलं आणि वेगळं सुचवू पाहणारी नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन 'सुमुख चित्र' निर्मित आणि 'अनामिका' प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं नाटक (Marathi Play) डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे डायरेक्टर कामेश मोदी यांच्या उपस्थितीत या नाटकाचा मुहूर्त 4 नोव्हेंबरला संपन्न झाला.
‘स्व’त्व म्हणजे आपले व्यक्तित्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्व जपता येते. प्रत्येकाच्या अंतरंगातले चैतन्य जरी एकच असले तरी प्रत्येकाचा ‘स्व’ मात्र वेगळा असतो. याच ‘स्व’चा उहापोह करत इतिहासाच्या पानांमध्ये दडपल्या गेलेल्या स्वत्वाचे एक प्रतिक म्हणजे ऊर्मिला आणि त्या ऊर्मिलेचे ते आयन म्हणजे ‘उर्मिलायन’नाटक !
नाटकाचा गहन आशय!
स्त्री आणि पुरुष यांच्यातील श्रेष्ठत्वाची लढाई त्यांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, ‘स्वत्व' जपूनही 'स्व' वर विजय प्राप्त करता येऊ शकतो का ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजही मिळू शकलेली नाहीत. कधी रुढीपरंपरांमुळे, तर कधी पुरूषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्ववादामुळे आजही कळतनकळत 'स्व'ची अवहेलनाच केली जाते. त्याला दुय्यम स्थान दिले जाते. अगदी सत्य, द्वापार , त्रेतायुगा पासून ते आजच्या कलीयुगापर्यंत हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडणाऱ्या या प्रश्नांचा उहापोह करणाऱ्या ‘उर्मिलायन’ या नाटकाचा रंगमंचीय अविष्कार प्रत्येकाने आवर्जून अनुभवायला हवा. याची निर्मिती सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव हे करीत आहेत.याचे लेखक दिग्दर्शक आहेत सुनिल हरिश्चंद्र आणि नेपथ्य अरुण राधायण यांनी केले आहे, संगीत निनाद म्हैसाळकर यांनी दिले आहे तर वेशभुषा मंदार तांडेल यांनी केली आहे. यातील प्रमुख कलावंत आणि इतर तंत्रज्ञ सध्या गुलदस्त्यात आहेत. ज्यामुळे एकूणच या नाटकाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे हे नक्की !
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक विजय निकम आणि लेखक, अभिनेता,दिग्दर्शक, समीक्षक, नाट्यप्रशिक्षक अरुण कदम यांनीही या नव्या नाटकाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उर्मिलायन’ सारखे नाटक रंगमंचावर करायला जिगर लागते, धाडस लागते, हे शिवधनुष्य कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी ऊचलले याचे खूपच कौतुक वाटते असं सांगत आता हे नाट्यपुष्प लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी आपली जबाबदारी ओळखून त्याच जबाबदारीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे मत विजय निकम यांनी बोलून दाखविलं. नाटकाची नाळ संगीताशी बांधलेली असून,त्याचा ताल नृत्यांवर आधारीत आहे. त्यामुळे एकाच नाटकात नवरसांचे नेत्रदिपक पारणे फेडणारे रंग ‘उर्मिलायन’ नाटकाला नक्कीच वेगळा आयाम देईल असा विश्वास अरुण कदम यांनी व्यक्त केला.