सिनेमागृहं वाचवा... सिनेमा वाचवा! थिएटर मालकांची सोशल मीडियावर मोहीम
एकीकडे थिएटर सुरू होतील म्हणून डागडुजी करून घ्यायची, दुसरीकडे त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार करायचा पण दुसरीकडे इन्कम काहीच नाही अशा अवस्थेत थिएटर मालक गवसला आहे.
मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून सिनेमागृहं बंदं आहेत. त्यामुळे एक पडदा थिएटर मालकांना चित्रपटगृह चालवायचं कसं हा प्रश्न पडला आहे. एकीकडे केंद्र सरकार एक एक गोष्टींसाठी परवानगी देतं आहे. आता तर अनलॉक 4 मध्ये मेट्रोही सुरू होणार आहेत. असं असताना चित्रपटगृहं मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. आपल्या मागण्यांकडे आणि एकूण थिएटरवाल्यांच्या अवस्थेकडे लक्ष वेधलं जावं म्हणून सोशल मीडियावर रविवारी पाच वाजता एक मोहीम राबवली जाणार आहे.
ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियावर ही मोहीम राबवली जाणार असून त्यात #सपोर्टमु्व्हीथिएटर्स #सेव्हसिनेमा असे हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. ही मोहीम सरकार विरोधातली नसून, आपल्या मागण्यांकडे आणि अवस्थेकडे लोकांचं लक्ष वेधलं जावं म्हणून असणार आहे. थिएटर मालकांची अवस्था सध्या खूपच वाईट आहे. एकीकडे थिएटर सुरू होतील म्हणून डागडुजी करून घ्यायची, दुसरीकडे त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार करायचा पण दुसरीकडे इन्कम काहीच नाही अशा अवस्थेत थिएटर मालक गवसला आहे.
याबद्दल दिग्दर्शक विजू माने यांनीही केलेली फेसबुकची पोस्ट व्हायरल होते आहे. ठाण्याचं वंदना थिएटर माने चालवतात. लॉकडाऊनपूर्वी काही महिने या थिएटरची डागडुजी करण्यात आली होती. अनलॉक 4 चे नवे नियम जाहीर झाल्यानंतर विजू यानी फेसबुकवर पोस्ट केली. ती अशी, 100 माणसं एकत्र येण्याची वेळ सिनेमा थिएटरवर आजकाल अभावाने येते हे आपल्या सरकारला माहित नाही.' त्यांच्या सांगण्याचा मुद्दा असा होता की, अलिकडे सिंगल स्क्रीनमध्ये एकावेळी 100 प्रेक्षकही नसतात. असं असेल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून थिएटरचे प्रवेश सुरू केले तर कदाचित काही दिवसांनी लोक पुन्हा थिएटरवकडे वळतील. सिनेमागृहं बंद ठेवण्याच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा म्हणून हे सोशल मीडियावरचं आंदोलन छेडण्यात आलं आहे.
TOP 50 | दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या