Vastraharan Marathi Theatre : 'वस्त्रहरण' पुन्हा रंगभूमीवर येणार; नाटकाच्या 44 वर्षाच्या निमित्ताने रंगणार 44 प्रयोग; दिग्गज कलाकार घेणार सहभाग!
Vastraharan Marathi Theatre : मालवणी भाषेचा झणझणीतपणा असलेल्या वस्त्रहरण नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यात या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
Vastraharan Marathi Natak : मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या वस्त्रहरण (Vastraharan) नाटकाचा लवकरच 5255 वा प्रयोग रंगणार आहे. वस्त्रहरण नाटकाला 44 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भद्रकाली प्रोडक्शनच्यावतीने (Bhadrakali Production) वस्त्रहरण पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. या वस्त्रहरण नाटकाचे 44 प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे. वस्त्रहरणच्या या विशेष 44 प्रयोगात सेलिब्रेटी कलाकारांचा समावेश असणार आहे.
मालवणी भाषेचा झणझणीतपणा असलेल्या वस्त्रहरण नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यात या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. 16 फेब्रुवारी 1980 मध्ये मच्छिंद्र कांबळी यांनी नाटकाला रंगभूमीवर आले. आजही या नाटकाची लोकप्रियता कायम आहे. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या "वस्त्रहरण" या अजरामर कलाकृतीला आज 16 फेब्रुवारी रोजी 44 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर मोजकेच 44 प्रयोग सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मालवणी भाषेतील नाटकाने इतिहास घडवला
मराठी रंगभूमीवर आतापर्यंत प्रमाण मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले. 16 फेब्रुवारी 1980 रोजी मच्छिंद्र कांबळीa यांनी "वस्त्रहरण" या नाटकाचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर प्रेक्षकांनी या नाटकाला तुफान प्रतिसाद दिला. गंगाराम गव्हाणकर यांनी या नाटकाचे लेखन केले होते.
कोणत्या कलाकारांचा असणार सहभाग?
वस्त्रहरणच्या या विशेष 44 प्रयोगांसाठी मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, यातील नावे अद्याप निश्चित झाले नसल्याची माहिती आहे.
'वस्त्रहरण'च्या 5000 व्या प्रयोगात दिग्गजांचा सहभाग
वस्त्रहरण नाटकाचा 5000 वा प्रयोग मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पाडला होता. हा प्रयोग 21 नोव्हेंबर 2009 रोजी पार पडला होता. या खास प्रयोगात प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर आदी कलाकारांनी भूमिका सादर केल्या होत्या. तात्या सरपंच यांची भूमिका संतोष मयेकर यांनी केली होती.