(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा आवाज ‘बीएमसीसी’च्या ‘मंजम्मापुराणम्’चा; 56 व्या पुरुषोत्तम करंडकावर कोरलं नाव
Purushottam Karandak : नाट्यश्रेत्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.
पुणे : महाविद्यालयांतील नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुरुषोत्तम करंडकाच्या (Purushottam Karandak) अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला अन् एकच आवाज घुमला ‘अरे आव्वाज कुणाचा’... यंदा ‘बीएमसीसी’ महाविद्यालयाच्या ‘मंजम्मापुराणम्’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘सहल' या एकांकिकेने तर तृतीय क्रमांक मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडच्या ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेने पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी दिला जाणारा जयराम हर्डीकर करंडक हा श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘नाईट इन मा माय ड्रीम्स’ एकांकिकेने पटकावला. तर आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सुशांत दिवेकरला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पारितोषिक जाहीर झाले.
प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकांकिकांची अंतिम फेरी नाट्यप्रेमींच्या ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसादात भरत नाट्य मंदिरात झाली. विजेत्यांना 29 जानेवारी रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
गेल्या पन्नास वर्षांत आजच्या अनेक दिग्गज कलाकारांना पुरुषोत्तम करंडक हे हक्काचे व्यासपीठ मिळाले. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर यांना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यावेळी यशाने हुलकावणी दिली होती. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत बाजी मारलेले जब्बार पटेल, सुषमा देशपांडे, गगनविहारी बोराटे, सतीश आळकर, योगेश सोमण, उपेंद्र लिमये, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, प्रवीण तरडे, लोकेश गुप्ते, आजचे मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर सारखे कलावंत स्वकर्तृत्वाने मोठे तर झालेच परंतु त्यांच्या विद्यार्थी दशेत घेतलेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा आणि दृष्टी प्राप्त झाली. या स्पर्धेला मोठे करण्यात या कलावंताचा मोठा वाटा आहे. या स्पर्धेत केवळ सहभागी होणे हे सुद्धा विद्यार्थ्यांमुळेच मोलाचे वाटते. महाराष्ट्रात अभिनय, लेखन, दिग्दर्शन, या सर्व तळ्यावर विद्यार्थ्यांचा कस पणाला लावून उत्तरोत्तर महाअंतिम फेरीपर्यंत रंगात वाढवणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा एकमेव आहे.
असा आहे पुरुषोत्तम करंडकचा इतिहास
महाराष्ट्रीय कलोपासक पुणे पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा 1963 पासून सुरू आहे. या स्पर्धेचे हे यंदाचे 56 वे वर्ष आहे. महाविद्यालयीन जगतातच, त्या वातावरणातच स्पर्धा व्हावी अशी कल्पना असल्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'अम्फी थियेटर मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती. त्यानंतर भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा सुरू झाली.
या स्पर्धेची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे तांत्रिक विभागासाठी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत कुठलेही पारितोषिक नाही. विद्यार्थ्यांनी कुठल्याही तांत्रिक बाबीमध्ये फार न अडकता नाटकाचा विषय लेखन, वाचिक, आंगिक, मुद्राभिनय याकडे प्रामुख्याने लक्ष्य दिले पाहिजे असा आहे. लेखन विद्यार्थ्यांचेच असावे असे आजही असे बंधन मात्र या स्पर्धेत नाही. जुन्या एकांकिकासुद्धा नव्या विचारांनी प्रेक्षकांसमोर जे मांडण्याचे नियम आव्हान विद्यार्थी या स्पर्धेत घेतात. त्याचबरोबर एकांकिकेची सर्व तयारी विद्यार्थ्यांनीच केली पाहिजे हा प्रमुख नियम आहे.
पुरुषोत्तम करंडकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे इथे हौशी रंगभूमीबरोबरच प्रायोगिक रंगभूमीवरच्या विषयाचा देखील कस लागतो. चाकोरीबाहेरच्या विषयाला हात घालून तो वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान पेलणाऱ्या संघाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी के जयराम हर्डीकर पारितोषिक दिले जाते. म्हणूनच पुरुषोत्तम करंडकाबरोबरच कै. जयराम हर्डीकर पारितोषिक मिळवणे हे प्रत्येक महाविद्यालयाचे स्वप्न असते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला
- Republic Day 2022 Song : बॉलिवूडमधील ‘ही’ देशभक्तीपर गाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील
- Netflix India : नेटफ्लिक्स इंडियाकडून 'टेक टेन' शॉर्ट फिल्म स्पर्धेची घोषणा, उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना मिळणार पाठबळ