The Indrani Mukherjee Story : नेटफ्लिक्सला हायकोर्टाचा दिलासा, 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
The Indrani Mukherjee Story : नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' या सिरिजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाकडून सीबीआयची याचिका फेटाळण्यात आलीये.
The Indrani Mukherjee Story : नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' (The Indrani Mukherjee Story) या वेबसिरिजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळी झाला आहे. कारण आता नेटफ्लिक्सला (Netflix) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून सीबीआयची याचिका फेटाळण्यात आलीये. सीबीआयकडून या वेब सिरीजच्या प्रदर्शनास विरोध कऱण्यात आला होता. पण आता सीबीआयचा प्रदर्शनास असलेला हा विरोध हायकोर्टानं ही सिरिज पाहिल्यानंतर नाकारला आहे. त्यामुळे 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' ही सिरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
एखादी व्यक्ती मुख्य आरोपी असताना, ती इनोसंट असल्याचं दाखवणं तेही त्या प्रकणावर सुनावणी सुरु असताना हे अयोग्य असल्याचा युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला होता. त्यामुळे ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होण्याआधी ती पाहणं आवश्यक असल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे.त्यानंतर हायकोर्टात या सिरिजचं स्पेशल स्क्रिनींग करण्यात आलं.
प्रदर्शन थांबवलं
या वेबसिरिजचं 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शन करण्यात येणार होतं. पण सीबीआयने हे प्रदर्शन थांबवण्याची याचिका हायकोर्टात केली. त्यानंतर 29 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज या वेबसिरिजचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आलं. त्यानंतर हायकोर्टाकडून या सिरिजचा रिलीज मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच आता ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिना बोरा हत्या प्रकरण
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं.
इंद्राणीनं वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयनं कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.