Sher Shivraj : Metaverse मधील 'शेर शिवराज'चा पहिला मराठी ट्रेलर रीलिज
Metawood कडून Metaverse मधील शेर शिवराजचा पहिला मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
मुंबई: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ आणि यूएफओ मुव्हीज यांच्याबरोबरच मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर रीलिज केला. मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा 'शेर शिवराज' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
सध्याची तरुणाई डिजिटल जगतात अधिकाधिक वेळ घालवते. त्यांच्याकडून विविध गॅजेट्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. हे लक्षात घेऊन मेटाव्हर्समध्ये 'शेर शिवराज'चा ट्रेलर रीलिज करण्यात आला आहे. ही कल्पना शिवराज अष्टक आणि दिग्पाल लांजेकर यांची आहे. मेटाव्हर्सच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये ऐतिहासिक नायकाबद्दल नवीन जोश निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
मेटावूड हे भारतातील पहिले एकात्मिक चित्रपट मेटाव्हर्स, NFT आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. याची निर्मिती मनोरंजन आणि चित्रपट रसिक असलेल्या तंत्रज्ञान तज्ज्ञांनी केली आहे. मेटाव्हर्स सर्व चित्रपट रसिकांसाठी एक गो-टू व्यासपीठ बनेल, ज्यांना WEB 3.0 मध्ये त्यांच्या चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'पावनखिंड' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच त्यांचा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय 22 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर हा 'शेर शिवराज' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे या चित्रपटामध्ये अफझल खानाची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी कॅप्शनमध्ये दिग्पाल यांनी लिहिले, 'होरात्र अन्याय-अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला.दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह. 'शेर शिवराज' 22 एप्रिल 2022'
महत्त्वाच्या बातम्या:
- शाहरुखच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, 'या' अभिनेत्रीसह पहिल्यांदाच दिसणार किंग खान
- Mulgi Zali Ho : किरण माने, अजय पुरकरांनंतर ‘या’ अभिनेत्रीचीही ‘मुलगी झाली हो’मधून एक्झिट!
- ‘गोलमाल’ फेम अभिनेत्रीचं निधन, लेखक स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली माहिती