पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता करण मेहराला अटक
टीव्ही अभिनेता करण मेहरा याला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : टीव्ही अभिनेता करण मेहरा याला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीसोबत भांडण करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी त्याला बेड्या ठोकल्या. करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे तो विशेष गाजला. या मालिकेत तो मध्यवर्ती भूमिकेत होता. याशिवाय त्यानं हिंदी बिग बॉस स्पर्धेतही सहभाग घेतला होता.
पत्नीसोबत भांडण करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी आता हा अभिनेता अडचणीत आला आहे. पत्नीला मारहाण करण्यात आल्यानंतर करणच्या पत्नीनं गोरेगाव पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. ज्यानंतर रात्रीच त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी (आज) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील कारवाई आणि सदर प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे.
मागील कैक दिवसांपासून करण आणि त्याची पत्नी निशा यांच्या वैवाहिक नात्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याची माहिती समोर येत होती. एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळंच त्यांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती. पण, या दोघांनीही वेळोवेळी या वृत्तांचं खंडन केलं होतं.
नात्यातील मतभेदांवर करण काय म्हणाला होता?
हल्लीच करणनं त्याच्या आणि पत्नीच्या नात्यातील या चर्चांबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. मागील काही दिवसांपासून आपली तब्येत नव्हती, त्यातच अशा प्रकारच्या चर्चांनी अडचणी आणखी वाढवल्या, असं तो म्हणाला होता. 'माझ्या ओळखीतील अनेक व्यक्तींचा मागील काळात मृत्यू झाला आहे, ज्यामुळं मी तणावात आहे. अशातच माझ्या खासगी जीवनाशी संबंधित अशा चर्चा पाहून मी आणखी विचलित झालो आहे. मला यासंदर्भात काहीही बोलायचं नव्हतं पण, बोलावं लागत आहे. निशा यावेळी माझी पूर्ण काळजी घेत आहे', असं करण म्हणाला होता.
मागील काही दिवसांपासून करण हा त्याच्या आगामी पंजाबी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होता. तर, त्याची पत्नी मुलासोबत मुंबईत होती अशी माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
