Trp : प्राइम टाइम संगे चाले टीआरपीचा खेळ; कसं ठरतं TRP चं गणित? जाणून घ्या...
Marathi Serial : मालिकांच्या टीआरपी रेटिंगमध्ये नेहमीच चढ-उतार होत असते.
Marathi Serial Trp Rating : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका (Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्माते वेगवेगळ्या कथानकासह नव-नवीन प्रयोग करत आहे. नाटक (Drama), सिनेमे (Movie), ओटीटी (Ott) कितीही गोष्टी आल्या तरी मालिकांची (Marathi Serial) जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. ग्रामीण भागातील प्रेक्षकांसह शहरी भागातील मालिकाप्रेमींना आवडतील अशा मालिकांची निर्मिती करण्यात येत आहे.
मालिंकासह मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार मालिकेत नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या मालिकेला प्रेक्षकांची किती पसंती मिळत आहे हे त्या मालिकेच्या टीआरपी रेटिंगवर अवलंबून असतं.
टीआरपीच्या शर्यतीत कोणती मालिका बाजी मारते यावर त्या मालिकेची लोकप्रियता दिसून येते. मालिकांसाठी प्राइम टाइम खूप महत्त्वाचा असतो. कोरोनाआधी संध्याकाळी 7 ते रात्री 9.30 हा प्राइम टाइम मानला जात होता. पण आता या प्राइम टाइमची लांबी वाढवण्यात आली आहे. आता ही वेळ संध्याकाळी 6.30 ते 10.30 अशी झाली आहे. सध्या प्राइम टाइमला 30-35 मराठी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
मराठी मालिका विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. प्राइम टाइम वाढल्याने मालिकांची संख्या वाढली. त्यामुळे आपलीच मालिका टीआरपीच्या शर्यतीत कशी अव्वल स्थानी येईल याकडे त्या मालिकेसंबंधित प्रत्येकाचं लक्ष असतं. तसेच प्राइम टाइममध्ये आपल्या मालिकेची नक्की कोणती वेळ योग्य याकडेदेखील लक्ष देणं गरजेचं असतं.
'या' कारणाने टीआरपी रेटिंगवर फटका
'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मालिका पूर्वी 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. या मालिकाचा टार्गेट ऑडियन्स हा शहरी भागातील प्रेक्षकवर्ग आहे. शहरी भागातील महिला घरातील कामं आटोपल्यानंतर किंवा नोकरीवरुन घरी परतत असताना ही मालिका पाहत असे. त्यावेळी ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहात होती. पण आता या मालिकेची वेळ संध्याकाळी 6.30 झाली आहे. 6.30 हा देखील प्राइम टाइम असला तरी या मालिकेच्या टार्गेट ऑडियन्सला ही मालिका पाहता येत नाही. मालिकेची वेळ बदल्याचा सगळ्यात मोठा फटका मालिकेच्या टीआरपी रेटिंगवर पडला आहे. पहिल्या दहात असणाऱ्या या मालिकेला या आठवड्यात 1.7 रेटिंग मिळाले आहे.
एखाद्या मालिकेचा टीआरपी घसरत असेल तर त्याचा थेट परिणाम संबंधित चॅनलवर होत असतो. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली तर ती मालिका बंद करण्याचा किंवा त्या मालिकेची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला जातो. एकंदरीत टीआरपीप्रमाणे मालिकेची वेळ ठेवण्यात येते.
संबंधित बातम्या