शिवजयंती दिवशी महाराज करणार अफझलखानाचा वध; ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेचा विशेष भाग
गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका टीव्हीवर दाखल झाली. स्वराज्याचा इतिहास मांडताना तो जिजाऊंच्या कार्याविषयी सांगितल्याशिवाय पूर्णच होणारा नाही.
मुंबई : महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. रयतेचा राजा, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर अनेक यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यांच्या अनेक शौर्यकथांपैकी एक कथा म्हणजे ‘अफझलखानाचा वध’. या वधानंतर महाराजांच्या शौर्याची आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची नोंद संपूर्ण जगात घेतली गेली. आता हाच ‘अफझलखानाचा वध’ आपल्याला पुन्हा एकदा पाहाता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत शिवजयंतीच्य़ा पावन दिवशी हा वध पहायला मिळणार आहे.
शत्रूचे कपट, गुप्त कारस्थानांपुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. संकटाच्या वेळी कल्पकता वापरून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची धैर्यवान बाजू त्यांच्या सगळ्या मोहिमांमधून आपणास दिसून येते. अफझलखान वधाचे संपूर्ण नियोजन करताना शिवाजी महाराजांनी कशाकशाचा वापर केला, कशाप्रकारे आखणी केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता पुन्हा एकदा होणार आहे.
गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका टीव्हीवर दाखल झाली. आजपर्यंत पडद्यावर आलेल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित अनेक मालिका, सिनेमा, नाटक यामध्ये जिजाऊंच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहेच. स्वराज्याचा इतिहास मांडताना तो जिजाऊंच्या कार्याविषयी सांगितल्याशिवाय पूर्णच होणारा नाही. पण संपूर्णपणे जिजाऊंचा जीवनप्रवास दाखवणारी एकही मालिका तयार झाली नव्हती. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून या मालिकेची निर्मिती करण्यात आली.