(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम आजही राहते विलेपार्लेच्या चाळीत; अभिनेत्रीच्या वडिलांनी होणाऱ्या जावयासाठी ठेवली 'ही' अट
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहल शिदम घराघरांत पोहोचली आहे.
Chala Hawa Yeu Dya Snehal Shidam : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहल शिदम (Snehal Shidam) घराघरांत पोहोचली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या स्नेहलचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. स्नेहल शिदम आजही विर्लेपार्लेमधील एका चाळीत राहते.
स्नेहल शिदमच्या घराची गोष्ट...
इस्ट मज्जाला दिलेल्या मुलाखतीत स्नेहल शिदमने तिच्या घराची गोष्ट सांगितली आहे. स्नेहल म्हणाली,"आई-बाबांचं घर घेण्याचं स्वप्न होतं आणि त्यांनी एक झोपडीचं घर घेतलं होतं. त्या घरात आम्ही तीन वर्षे राहिलो. एकदा काही कामानिमित्ताने आम्ही घराबाहेर गेलो होतो आणि घरी परतलो तेव्हा उंदरांनी सर्व अन्नाची नासाडी केली होती. मुलांच्या पुढ्यातलं अन्न गेल्यामुळे वडिलांनी घरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला".
स्नेहल पुढे म्हणाली,"माझ्या घरच्यांनी मला कधीच कोणती जबाबदारी सोपवलेली नाही. पण आई-वडिलांचे कष्ट मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यांचा वाईट काळ जवळून पाहिला आहे. त्यांची धडपड पाहिली आहे. आताही प्रत्येक गोष्टीत ते मेहनत घेत आहेत. दर महिन्याला तू अमूक एवढे पैसे द्यायला हवेत असं माझ्या घरच्यांनी मला सांगितलेलं नाही. माझी आई पूर्वी दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची कामे करत असे. पण 'चला हवा येऊ द्या'चा प्रवास सुरू झाल्यानंतर मी आईला काम न करण्याचा सल्ला दिला". एक चांगलं घर घेण्याचं स्नेहल शिदमचं स्वप्न आहे.
स्नेहल शिदमचं बालपण विलेपार्लेच्या चाळीत गेलं आहे. स्नेहलला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तिने एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायला सुरुवात केली. दरम्यान 'चला हवा येऊ द्या'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका स्पर्धेत स्नेहल सहभागी झाली आणि विजेतीदेखील झाली. या कार्यक्रमामुळे स्नेहल रातोरात सुपरस्टार झाली. स्नेहलने घेतलेल्या मेहनतीचं तिच्या घरच्यांना कौतुक आहे. स्नेहलने आता घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली आहेत.
स्नेहलच्या लग्नाबद्दल वडील म्हणाले...
स्नेहलच्या वडिलांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जावई कसा हवा याबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले,"माझा जावई कोकणातला असावा अशी माझी इच्छा आहे. कोकणची माणसं साधी असल्यामुळे स्नेहलचा नवरा कोकणी असावा, अशी माझी अट आहे. तसेच स्नेहल एका वेगळ्या क्षेत्रात काम करत असून आमच्याप्रमाणे त्यानेही तिला या क्षेत्रात काम करण्यासाठी साथ द्यायला हवी. स्नेहला आता 26 वर्षांची असून तिचं लग्न झालं की मी आणि स्नेहलची आई गावी राहायला जाणार आहे".
संबंधित बातम्या