रात्रीस खेळ चाले पुन्हा चर्चेत! छोटे आण्णा अन् छोटी शेवंता यांचे फोटो व्हायरल
सध्या सोशल मीडियावर रात्रीस खेळ चाले या मालिकेची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. चर्चा होण्यामागे कारण म्हणजे, आण्णा नाईक, शेवंता, माई यांच्या त्याच वेशभूषेतले लहानपणीचे फोटो.
मुंबई : रात्रीस खेळ चाले या मालिकेत चांगली लोकप्रियता मिळवली. सगळीकडे कुटुंब वत्सल... सून-सासू नाट्य रंगलं असताना रात्रीस खेळ चाले या मालिकेनं जरा वेगळी वाट धरली. तिथेही सासू-सून हे नाट्य होतं. पण त्या पलिकडे अनेक गोष्टी या मालिकेत घडत होत्या. यात थरार होता. यात मालवणी भाषेचा गोडवा होता. या मालिकेत भावंडांचा झगडा होता. सगळं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, यात होता खुनाचा थरार... आणि भूताचा वावर. त्यामुळे ही मालिका वेगळी ठरली. पहिले दोन्ही सीझन लोकांना आवडले. पण आता आणखी एका सीझनची चर्चा ऑनलाईन विश्वात जोरावर आहे. ती चर्चा आहे छोट्या शेवंता, माई आणि आण्णा नाईकांची.
ही गंमत आहे एका डिजिटल अॅपची. यात चेहऱ्यात बदल करून आण्णा नाईक, शेवंता, माई यांच्या त्याच वेशभूषेतले लहानपणीचे फोटो तयार करण्यात आले आहेत. ते सध्या फोटो बरेच व्हायरल होत आहेत. रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांपर्यंत हे फोटो पोहोचले आहेत. त्या सर्वांनी ही गंमत खूपच एन्जॉय केली आहे. अॅपद्वारे गंमत केलेले दोन फोटो व्हायरल होत आहेत. त्यातल्या एका फोटोत आण्णा नाईक, शेवंत आणि माई असे तिघे उभे दिसतात. त्यात त्यांची वेशभूषाही मालिकेत असते तशी आहे. आण्णांनीही हाती बंदूक धरली आहे. तर शेवंता आणि माईने नेहमीप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं एक्स्प्रेशन दिलं आहे. तर दुसरा फोटो आहे तो आण्णा आणि शेवंताचा आहे. पण तो फोटो एखाद्या पार्टीतला असावा असा आहे.
प्रथम दर्शनी ही कोणं मुलं आहेत असा प्रश्न पडतो. अलिकडे जाहिरातींमधून मोठ्यांसारखे पेहेराव, रंगभूषा केलेली लहान मुलं दिसतात. ही लहान मुलं मोठ्यांसारखा अभिनय करतात पण त्यांना आवाज मोठ्यांचे असतात. बऱ्याच जाहिराती आहेत अशा. तसाच हा काही प्रकार आहे की, काय असं वाटून जातं. पण नंतर हे फोटो बारकाईन पाहिल्यानंतर यातली गंमत कळते. आण्णांचा चेहरा मुलाचा असला तरी त्यांचा बंदूक धरलेला हाताचा पंजा आणि त्यातल्या अंगठ्या पाहिल्या की हा हात मात्र आण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर यांचाच आहे याची खात्री पटते. ती पटत असतानाच, या फोटोत फोटोशॉप गंमत केल्याचं लक्षात येतं. यात शेवंता आणि माईचे फोटो मात्र बरहुकूम झाले आहेत. आण्णा, शेवंता आणि माई... लहानपणी असेच दिसत असणार याची खात्री पटते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा या मालिकेची आठवण नेटकऱ्यांना झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :