काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
कर्तव्यनामावर बोलताना खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला.

Kolhapur Municipal Corporation Elections: काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं या टॅगलाईनखाली प्रचार मोहीम आखत जाहीरनामा मांडला. यानंतर आता कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडूनही ‘जे मनात तेच मनपात’ या टॅगलाईनखाली कर्तव्यनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कर्तव्यनामाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांसमोर राज्य व केंद्र सरकारच्या ताकदीवर आधारित निधी, योजना आणि ठोस प्रकल्पांचा आराखडा मांडण्यात आला आहे. या कर्तव्यनामावर बोलताना खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला.
“घोषणाबाजी नाही, मंजूर कामांसह आम्ही जनतेसमोर आलो आहोत”
धनंजय महाडिक यांनी सांगितले की, “आम्ही निवडणुकीत फक्त स्वप्न दाखवायला नाही तर मंजूर प्रकल्प घेऊन उतरलो आहोत.” अंबाबाई मंदिराचा विकास, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे, महापूर नियंत्रण, उड्डाण पूल, बास्केट ब्रिज, आयटी पार्क यासारखी महत्त्वाची कामे आधीच मंजूर असून त्यावर काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला असून हे रस्ते पुढील २५ वर्षे टिकतील, असेही महाडिक म्हणाले. सतेज पाटील यांच्या कार्यक्रमबाजीवर बोट ठेवले. “इव्हेंट करून जनतेची दिशाभूल केली जाते, पण आता कोल्हापूरकर फसणार नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. महाडिक म्हणाले की, राहुल गांधी यांच्या स्टाईलने प्रेझेन्टेशन दिले, पण गंगा म्हणून नाल्यात पडलेल्या राहुल गांधी यांच्यासारखी अवस्था झाली आहे. 15 वर्षे यांच्याकडे सत्ता होती त्यावेळी या गोष्टी का केल्या नाहीत? सतेज पाटील यांनी केएमटीमधून प्रवास करून दाखवला, पण याआधी कधी त्यांनी बसमधून प्रवास केला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.
“सत्ता आमच्याकडे आहे, मग निधीची चिंता कशाला?”
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, “केंद्र आणि राज्यात आमचेच सरकार आहे. जिल्ह्यात दहा आमदार आमचे आहेत. मग विरोधक निधी कुठून आणणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधक फक्त जाहीरनाम्यांतून आमिषे दाखवत असल्याचा आरोप करत, “तुमच्याकडून विकास होणार नाही, उलट तुम्ही आम्हालाच पाठिंबा द्या,” असा टोला त्यांनी लगावला. मुश्रीफ यांनी थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटीही मान्य केल्या. योजनेचा भौगोलिक आणि हवामान अभ्यास न केल्यामुळे अडचणी आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, सुधारणांची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
“विश्वास असेल तरच विकास होतो”
प्रकाश आबिटकर यांनी महायुतीच्या कर्तव्यनामावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “वचननामा पूर्ण करायचा असेल तर नेत्यांवर विश्वास हवा, आणि तो विश्वास महायुतीच्या नेतृत्वावर आहे,” असे ते म्हणाले. पारदर्शी प्रशासन, अधिकाऱ्यांची वेळोवेळी बदली, आणि नव्या प्रयोगांना संधी देणारी यंत्रणा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निधीतून विकासकामांना कोणतीही अडचण येणार नाही,” असे आबिटकर यांनी सांगितले.
“कोल्हापूरची सत्ता द्या, मग विकास दिसेल”
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने योजना, आयटी पार्कसाठी निश्चित जागा, क्रिकेट स्टेडियम, तसेच अंबाबाई आणि जोतिबा देवस्थानासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “महायुतीकडे महापालिकेची सत्ता आली तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती कर्तव्यनामा – कोल्हापूर मनपा
🏛️ प्रशासन व सेवा
-
.myKMC अॅप – जन्म-मृत्यू दाखले, परवाने, घरफाळा, बस पास, गाळे भाडे एकाच अॅपवर
-
सर्व महापालिका सेवा ऑनलाईन व कागदविरहित
-
नवी महापालिका इमारत उभारणार
-
नागरिकांच्या सूचनांवर आधारित लोकसहभागी अर्थसंकल्प
💰 कर व मालमत्ता
-
घरफाळा पद्धतीत सुधारणा, राज्यभर समान प्रणाली
-
व्यापारी-उद्योगांना अनुकूल धोरण
-
महापालिकेच्या आरक्षित जागा ताब्यात घेऊन नियोजनबद्ध वापर
🎓 शिक्षण
-
महापालिका शाळांसाठी तज्ज्ञ समिती
-
बंद शाळा इमारतींचा नागरी सुविधांसाठी वापर
🌊 पर्यावरण
-
पंचगंगा प्रदूषणमुक्त – ड्रेनेज, सांडपाणी प्रक्रिया, घाट सुशोभिकरण
-
रंकाळा तलावाचा विकास – सांडपाणी पूर्ण बंद
🚌 वाहतूक
-
२०० इलेक्ट्रिक बसेस
-
ऑनलाईन तिकीट व पास
-
७० वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास
🗑️ कचरा व्यवस्थापन
-
आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ व सामाजिक संस्थांचा सहभाग
🏟️ क्रीडा व संस्कृती
-
शिवाजी-शाहू स्टेडियम, जलतरण तलाव नूतनीकरण
-
कोल्हापूर केसरी कुस्ती पुन्हा सुरु
-
महापालिकेचा संगीत महोत्सव
-
केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण
-
अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर
🔐 सुरक्षा
-
उपनगरात CCTV जाळे
-
महिलांसाठी सुरक्षित शहर
-
अंमली पदार्थविरोधी कडक कारवाई
🚗 पार्किंग
-
महापालिकेच्या जागांवर सशुल्क पार्किंग तळ
🌳 आरोग्य व विरंगुळा
-
ऑक्सिजन पार्क
-
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र
🛣️ रस्ते
-
सर्व प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रिटचे (२५ वर्षे टिकणारे)
-
प्रवेशमार्ग रुंदीकरण व फ्लायओव्हर
-
शहर प्रवेशद्वारांचे सुशोभिकरण
🏚️ झोपडपट्टी
-
प्रमुख झोपडपट्ट्यांना प्रॉपर्टी कार्ड
🏭 उद्योग व आयटी
-
उद्यमनगर, वाय. पी. पोवार, पांजरपोळ विकास
-
कोल्हापूर IT हब बनवणार
🌿 बागा
-
CSR व लोकसहभागातून सार्वजनिक बागांचे सुशोभीकरण
☀️ ऊर्जा
-
सौर पथदिवे
🛒 फेरीवाले
-
झोन पद्धती, वाहतुकीला अडथळा नको
-
खाऊ गल्लींमध्ये शिस्त
🔥 गॅस
-
उज्ज्वला योजनेतून गॅस पाइपलाइन
🎨 कला व संस्कृती
-
कलाकारांसाठी कार्यशाळा, प्रदर्शन, पुरस्कार
-
कोल्हापुरी हस्तकलेचे ब्रँडिंग
🏥 आरोग्य
-
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
-
CPR हॉस्पिटलचे आधुनिकीकरण
🚺 महिला सुविधा
-
शहरात १० ठिकाणी महिला स्वच्छतागृहे
👑 विशेष सन्मान
-
दरवर्षी ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार'
इतर महत्वाच्या बातम्या




















