Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केला.

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये पार पडली. या निवडणुकीत विधानसभा राहुल नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. नाशिकमध्ये वचननामा जाहीर केलेला आहे, तुमच्यासमोर सगळं घडतंय, आज जसं बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाही विरोधात मैदानात उतरतोय. आमचा शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र यांच्या दडपशाहीपुढं गप्प बसणार आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. वचननामा हा ठाकरेंचा शब्द आहे, मोदी गॅरंटी नाही, ठाकरे जे बोलतात ते करतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल
बिनविरोध निवडणुका जिकडे झाल्या, तो राहुल नार्वेकर, विधानसभेचा अध्यक्ष, विधानसभेत त्याचा अधिकार असतो. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष पूर्णपणे निष्पक्ष असला पाहिजे. आमच्यावर घराणेशाहीवरुन आरोप करणारे भाजप या राहुल नार्वेकरांच्या घरातल्या तिघांना उमेदवारी देतो. तो समोरचा उमेदवार त्यानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातोय. आम्ही जरा कुठं काय केलं की निवडणूक आयोग हातोडा घेऊन बसलेला असतो. यांनी काही केलं तरी निवडणूक आयोग काही करत नाही कारण निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसलेला आहे. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे. आज जर आपण उठून उभे राहिलो नाही तर वरंवटा असा फिरेल पुन्हा एकदा इंग्रजांपेक्षा जास्त दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ यांच्या गुलामगिरीत राहावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नाशिकमध्ये तपोवन कापतायत, आरेचं जंगल कापलं, अरवली पर्वत बोडका करत आहेत. ताडोबात खाणीसाठी जागा देत आहेत. ताडोबाला झालं नाशिकमध्ये झालं नाही, असा विचार करु नका, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मुंबईत सर्व जण खोकत आहेत, कारण नियोजन शून्य विकास, असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आम्ही तुम्हाला चांगलं आयुष्य देण्यासाठी एकत्र आलो आहोत. होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत. ती सत्ता तुमच्या विकासासाठी राबवायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मुंबईतील महापालिका शाळांचा दर्जा तुम्ही येऊन बघा, असंही ठाकरे म्हणाले.
मुंबईत महापालिका शाळेत मोफत शिक्षण मिळतेय, आठ भाषांचा शाळा आहेत. नाशिकची सत्ता द्या, नाशिकच्या महापालिका शाळांमध्ये मुंबईप्रमाणं अभ्यासक्रम सुरु करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.




















