Kon Honar Crorepati : डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चा आगामी भाग डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांबरोबर रंगणार आहे.
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि प्रसिद्ध लेखक, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सहभागी होणार आहेत.
दृष्टिहीन माणसं जास्त डोळसपणे वागतात, बोलतात आणि खेळतात असं म्हणतात. क्रिकेट या खेळाचं भारतामध्ये अनोखं आकर्षण आहे. दृष्टिहीन माणसांना देखील या खेळाने भूल घातली. 'क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र' अशा संस्था दृष्टिहीन खेळाडूंना शिकवतात आणि खेळण्यासाठी प्रेरित करतात.
'क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र' या संस्थेला मदत म्हणून सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि सुप्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि प्रसिद्ध लेखक, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांबरोबर 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग रंगणार आहे.
'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती यासारखे मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यातील विशेष भागात डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी सहभागी होणार आहेत.
View this post on Instagram
आरोग्यसेवेसाठी राज्यभरात ओळखले जाणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी एक लाख पासष्ट हजारापेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. तर तेहेतीस वर्ष महानगरपालिकेत नोकरी करून स्वतःची लिखाण, क्रिकेटची आवड जपत द्वारकानाथ संझगिरी यांनी कलाक्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली आहे. या कार्यक्रमात डॉ. तात्याराव लहाने यांनी लहानपणी डॉक्टर व्हायचं का ठरवलं याचा गमतीशीर किस्सा तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली पहिली शस्रक्रियेचा अनुभव सांगितला. आजच्या पिढीला परिचित नसलेल्या सुकडी आणि तरवट्याच्या भाजीबद्दलच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तर द्वारकानाथ यांनी क्रिकेट क्षेत्र का निवडलं, समीक्षण करतो हे वडिलांपासून लपवून का ठेवला असे किस्से सांगत त्यांचा प्रवास सांगितला.
जगभर भ्रमंती केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांनी जगातली शिस्त आणि नेत्याने कसं वागाव ही गोष्ट भारताने शिकावी असे मत व्यक्त केले. तर डॉ. तात्याराव लहाने यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी तसेच हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर केलेल्या उपचारांचा अनुभव सांगितला. द्वारकानाथ यांची समीक्षा वाचून कोण भडकलं, पतौडीला दोन बॉल दिसत असून तो कसा खेळायचा, सुनील गावस्कर हेल्मेटशिवाय कसा खेळायचा, सचिनचा साधेपणा, तात्याराव लहाने यांच्या चमूने मिळून केलेल्या साडेतीन लाख शस्त्रक्रिया, किल्लारी गावातील भूकंपात काम केलेलंय, मधुबालाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी अशा अनेक रंजक गोष्टींनी 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग रंगणार आहे.
कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप
संबंधित बातम्या