Tirthanand Rao : 'द कपिल शर्मा'मधील कॉमेडियननं फेसबुक लाइव्ह करत उचललं टोकाचं पाऊल; लिव्ह इन पार्टनरने फसवल्याचा आरोप
Tirthanand Rao : लोकप्रिय विनोदवीर तीर्थानंद रावने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Tirthanand Rao Attenpted Suicide : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. काही काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही या कार्यक्रमाची क्रेझ कायम आहे. आता या कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीर तीर्थनंद रावने (Tirthanand Rao) फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
तीर्थनंद रावने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्याने फेसबुक लाइव्ह केलं होतं. दरम्यान त्याच्या एका मित्राने लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी तीर्थनंद रावला रुग्णालयात दाखल केलं.
लिव्ह इन पार्टनरने फसवल्याने उचललं टोकाचं पाऊल
आज तकने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक लाइव्हदरम्यान तीर्थानंद म्हणाला की, आज त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीला एक महिला जबाबदार आहे. मला न्याय मिळायला हवा". तीर्थानंद या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून तिला दोन मुलंदेखील आहेत. काही दिवसांपूर्वीच मला कळलं की, ही महिला वैश्याव्यवसायाचं काम करते. त्यानंतर मी तिला ते काम बंद करण्याचा सल्ला दिला तर तिने मला धमकी दिली आणि माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यामुळे मी माझ्याच घरात राहू शकत नाही. मी आता रस्त्यावर आलो असून त्यामुळे मी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत आहे". त्यानतर तीर्थानंदने फिनाईल पिण्यास सुरुवात केली.
'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात तीर्थानंद राव ज्युनियर आर्टिस्ट म्हणून दिसले होते. तीर्थानंद राव हे ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून ओळखले जातात. लिव्ह इन पार्टनरमुळे तीर्थानंदवर 3-4 लाखांचं कर्ज आहे. तीर्थानंदने याआधीदेखील 2021 मध्ये आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.
तीर्थानंद असंही म्हणाला होता की,"पाव भाजी' नावच्या एका सिनेमासाठी मला विचारणा झाली होती. त्यानंतर मी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं पण अद्याप मला माझे पैसे मिळालेले नाहीत. त्यानंतर मी काही वेबसीरिजमध्येदेखील काम केलं. पण त्याचंही मानधन मला मिळालं नाही. त्यामुळे वडा-पाव खाऊन मी दिवस काढत आहे. त्यामुळे असं रडत आयुष्य जगण्यापेक्षा ते संपवलेलं बरं असा विचार माझ्या मनात आला".
संबंधित बातम्या