Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम दीपा आता दिसणार नव्या भूमिकेत; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका
Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे (Reshma Shinde) मुख्य भूमिकेत आहे.
Gharoghari Matichya Chuli : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका (Marathi Serials) सुरू आहेत. विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अशातच आता 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे (Reshma Shinde) मुख्य भूमिकेत आहे. रेश्मा याआधी 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होती. आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला रेश्मा सज्ज आहे.
कवयित्री विमल लिमये यांची 'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,' ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका 'घरोघरी मातीच्या चुली'
'घरोघरी मातीच्या चुली' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका होय.
View this post on Instagram
सतीश राजवाडे 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेबद्दल बोलताना म्हणाले,"रसिकांच्या अवती भवती होणाऱ्या गोष्टी मालिकेत दिसल्या की त्या आपल्याशा वाटतात. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहित आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात. कुटुंब म्हण्टलं की माणसं आली, भांड्याला भांडं लागणारच. पण म्हणून कोणी आपल्या माणसांना अंतर देत नाही".
सतीश राजवाडे पुढे म्हणाले,"प्रत्येकाला सांभाळून आपण पुढे जातो. जो हिंमत ठेवतो, ज्याला माणसं जोडून ठेवता येतात तो जिंकतो. ही मालिका सुद्धा अशीच आहे नात्यांवर भाष्य करणारी. कोणत्याही परिस्थितीत दोष व्यक्तींचा नाही तर परिस्थितीचा असतो असं समजून घर टिकवणारी. तोडणं फार सोपं असतं, कठीण असतं ते जोडून ठेवणं".
अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारणार जानकी रणदीवे
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारणार आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली,‘रंग माझा वेगळा' मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती".
नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली मला भावली : रेश्मा शिंदे
रेश्मा पुढे म्हणाली,"जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली".
तगडी स्टारकास्ट असलेली मालिका
सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशी दिग्गज कलाकार मंडळी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून भेटीला येणार आहेत. सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
संबंधित बातम्या