'सूरज आणि माझं गाणं येणार', बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आर्याचं चाहत्यांना गिफ्ट; एबीपी माझाला दिली माहिती
Aarya Jadhav: सूरज आणि आर्याचं नवं गाणं येणार असल्याची माहिती आर्याने एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.
Aarya Jadhav: बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात हिंसा केल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यानंतर आर्याने तिची बाजू मांडत एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. इकतच नव्हे तर तिने यावेळी प्रेक्षकांना एक मोठा सुखद धक्काही दिला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या गोष्टीची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.
आर्याने तिचं आणि सूरजचं गाणं येणार असल्याची माहिती एबीपी माझाला दिली. आर्याने हे गाणं तयारही करुन ठेवलं असल्याचं तिने एबीपी माझाला सांगितलं आहे. त्यामुळे सध्या आता त्यांच्या या गाण्याची दोघांच्याही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. सूरज जेव्हा घराबाहेर येईल तेव्हा हे गाणं प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.
आर्याने दिली माहिती
सूरज चव्हाण विषयी तुला काय वाटतं, असा प्रश्न आर्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आर्याने म्हटलं की, तो बाळ आहे. आपला लहान भाऊ कसा असतो, तसाच तो वागायचा. असं म्हणतात की, लोक सहज प्रेम नाही करत. लोकांना जे दिसतं त्यावरुन ते त्यांचं मत बनवतात. त्यामुळे बाहेर आल्यावरही जर मला कळालं की, बापरे सूरजवर एवढं प्रेम करायत, तर त्याचं मला आश्चर्य नाही वाटलं. कारण घरातही आमच्या सगळ्यांचा लाडका तोच होता. आम्हाला तर आतमध्ये माहितीही नव्हतं की, तो बाहेर किती प्रसिद्ध आहे. ते बुक्कीत टेंगूळ वैगरे माहिती होतं. पण हे सगळं माहिती नव्हतं. आता तर सूरज बाहेर आल्यानंतर माझं आणि त्याचं गाणंही येणार आहे. मी ते गाणं बनवून ठेवलं आहे.
आर्या बिग बॉसच्या घराबाहेर
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. त्यामध्ये घरातल्यांना मोती ताब्यात घेऊन एका सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यातीमधून बाद करायचं होतं. त्यावेळी बाथरुमध्ये निक्की आणि आर्याचा वाद सुरु असताना निक्कीने आर्याला धक्का दिला. त्यावर राग अनावर होऊन आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. बिग बॉसच्या घरात हिंसा न करणं हा मूलभूत नियम आहे. पण आर्याने या नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे बिग बॉसने आर्यावर कारवाई करत तिला घराबाहेर काढलं.