माणसांचं मांस खाऊन जगण्याची वेळ येते; विमान अपघाताची ह्रदयद्रावक कहाणी दाखवणारा सिनेमा
Society of the Snow Movie : जेव्हा माणसांचं मांस खाऊन जगण्याची वेळ येते; विमान अपघाताची ह्रदयद्रावक कहाणी दाखवणारा सिनेमा

Society of the Snow Movie : "पहिल्यांदा जेव्हा मी मानवाचं मांस खाल्लं, तेव्हा लगेच उलटी झाली आणि ते बाहेर पडलं... पण आमच्यासमोर यापेक्षा भयानक वेळ पुढे येणार होती...", ही वाक्य आहेत, एडुआर्डो स्ट्रॉच यांची... 1972 मधील विमान दुर्घटनेत वाचलेल्यांपैकी ते एक होते. समुद्रसपाटीपासून 12,000 फूट उंचीवर, मायनस 30 अंश तापमानात, अन्न-पाणी नसताना 72 दिवस मृत्यूशी झुंज दिली. लोकांच्या जिवंत राहण्याच्या इच्छाशक्तीवर आधारित "सोसायटी ऑफ द स्नो" (Society of the Snow) हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालाय. विमान दुर्घटनेनंतर बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या लोकांची ही कहाणी आहे. सध्या नेटफ्लिक्सवर या सिनेमाला मोठी लोकप्रियता मिळत आहे.
उरुग्वे एअर फोर्सची फ्लाइट पायलटसह 13 ऑक्टोबर 1972 रोजी 45 प्रवाशांसह उड्डाण करते. हवामान अत्यंत खराब असल्याने पायलटला समोर काहीच दिसत नव्हते. चुकीचा अंदाज घेतल्याने विमान थेट बर्फाच्छादीत पर्वतरांगांवर आदळून कोसळले. या अपघातात 45 पैकी 33 लोक वाचले, पण त्यांच्यासाठी पुढचा काळ मृत्यूपेक्षा भयंकर होता. गोठवणाऱ्या थंडीत, कपड्यांचा अभाव असताना ते हळूहळू मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचले. तिथे बर्फाशिवाय काहीच नव्हते.
सुरुवातीला बूट, कपडे आणि नंतर मानवी मांस
विमानातले उरलेसुरले अन्न संपताच लोकांनी भुकेपासून वाचण्यासाठी बूट, कपडे खायला सुरुवात केली. परिस्थिती बिकट होत गेली आणि शेवटी त्यांनी ठरवलं – जगण्यासाठी काहीही करावं लागलं. चर्चेनंतर ठरलं की जिवंत राहण्यासाठी मृत सहप्रवाशांचे मांस खावे लागेल.
ब्रिटनच्या द सन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एडुआर्डो स्ट्रॉच यांनी ही भयावह कहाणी सांगितली. ते म्हणाले – "पहिल्यांदा जेव्हा मी मानवी मांस खाल्ले, तेव्हा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. मी मानसिकदृष्ट्या तयार होतो, पण माझ्या शरीराने ते स्वीकारलं नाही. माझं शरीर ते बाहेर फेकून दिलं." पुढे बोलताना एडुआर्डो म्हणाले, त्यांच्या संस्कृतीमुळे त्यांचं शरीर ते पचवू शकत नव्हतं. "मानवी मांसाला काही स्वाद नव्हता... जणू मी भात खात आहे असं वाटत होतं."
भूक आणि थंडीमुळे मरत असलेल्या लोकांना त्यांचा चुलतभाऊ फिटोने मानवी मांस खाण्यास प्रवृत्त केले. त्यानेच पहिल्यांदा बर्फाखाली जतन झालेले मृतदेह कापून खाण्यास सुरुवात केली. एडुआर्डो म्हणतात, "पहिल्यांदा मानवी मांस खाणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, पण त्याने मला मदत केली." अपघाताच्या दहाव्या दिवशी विमानातील अन्न संपले होते. त्यानंतर ते फक्त जिवंत राहण्यासाठी थोडंसं मांस खात असतं.
खरी कसोटी अजून बाकी होती
विमानाचे अवशेष वापरून ते थंडीपासून वाचत होते. पण अचानक भीषण हिमवादळ आलं आणि सर्व काही नष्ट झालं. एडुआर्डो जिवंतपणी बर्फाखाली गाडले गेले. "मला वाटलं मी मरणार आहे. मृत्यू असाच असतो असं मला जाणवलं," ते सांगतात. पण काही क्षणांतच त्यांनी हातपाय हलवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि चुलतभावाने त्यांना बाहेर काढलं. त्या वादळात 8 जण ठार झाले. त्यात त्यांचा जिवलग मित्र मार्सेलो पेरेझ होता. माझा मित्र माझ्या शेजारीच बर्फाखाली गाडला गेला आणि मृत झाला. मी त्याचा चेहरा साफ करण्याचा प्रयत्न केला, पण तो आधीच मरण पावला होता,"
मानसिक लढाई
एडुआर्डो म्हणतात, "अशा परिस्थितीत आपला मेंदू वेगळ्याच पद्धतीने काम करतो. आम्ही दु:खी झालो नाही, रडलो नाही. दु:खात वेळ घालवणे म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणे. तीच ऊर्जा जीवन वाचवण्यासाठी हवी होती." 72 दिवसांच्या संघर्षात त्यांची सर्वात मोठी लढाई ‘सकारात्मक राहणे’ ही होती.
रेस्क्यूची आशा संपली होती
अपघाताच्या अकराव्या दिवशी त्यांनी रेडिओवर ऐकलं की शोध मोहीम बंद झाली आहे. जगाने समजून घेतलं होतं की कोणीच वाचलं नसेल. पण एडुआर्डो म्हणतात, "आपल्याला वाचवणारा एकमेव आधार होता – प्रेम. आपल्याला कुटुंबाची, आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची आठवण येत होती." त्यांचा चुलतभाऊ फिटो हुशारीने मेटल ट्रेवर बर्फ वितळवून पाणी बनवत असे.
स्वतःच मदतीसाठी प्रयत्न
महिने गेले तरी कोणी आले नाही. लोक मरायला लागले. शेवटी नँडो पर्राडो आणि रोबर्टो कॅनेसा यांनी 12 डिसेंबरला पर्वत ओलांडण्याचा निर्णय घेतला. योग्य कपडे नव्हते, अनुभव नव्हता, पण त्यांनी हार मानली नाही. दहा दिवसांच्या प्रवासानंतर त्यांनी मदत मिळवली. 22 डिसेंबरला हेलिकॉप्टर आले. त्या दिवशी फक्त 6 लोकांना बाहेर काढले गेले. दुसऱ्या दिवशी उरलेल्यांना वाचवण्यात आलं. एडुआर्डो म्हणतात, "हेलिकॉप्टरचा आवाज हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आवाज होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता."
इतर महत्त्वाच्या बातम्या























