Moose Wala Murder Case : करण जोहरकडून पाच कोटीची खंडणी वसूल करण्याचा डाव होता; बिश्नोई गँगच्या महाकालचा गौप्यस्फोट
Moose Wala Murder Case : सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
Moose Wala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. बिश्नोई गँगचा कथित सदस्य सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान सिद्धेश एक गौप्यस्फोट केला आहे. सिद्धेशनं सांगितलं की, बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचं नाव सामील होतं. करण जोहरकडून (karan johar) पाच कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी होती अशी माहिती महाकालनं दिली, असं शनिवारी (18 एप्रिल) पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सिद्धेश कांबळे उर्फ महाकालनं केलेल्या या दाव्यांची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही.
सिद्धेश कांबळे हा संतोष जाधवचा जवळचा सहकारी आहे. संतोष हा पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील संशयित शूटर आहे. तसेच त्याला या हत्येच्या कटाची चांगली माहिती आहे, असंही म्हटलं जात आहे. सिद्धेश कांबळे हा यापूर्वी पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये करण जोहरचं बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये नाव होतं, असं सिद्धेशनं सांगितलं.
मूसेवाला खून प्रकरण आणि अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रांसंदर्भात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल, पंजाब पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी सिद्धेश कांबळेची चौकशी केली.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चौकशी दरम्यान सिद्धेश कांबळेनं मुसेवाला खून प्रकरणाबाबत काही माहिती दिली आहे. जाधव आणि नागनाथ सूर्यवंशी यांचा या हत्येत सहभाग असल्याचेही कांबळेनं सांगितलं. तसेच त्यानं बिश्नोई गँगच्या भविष्यातील योजनाही सांगितल्या. सिद्धेश कांबळेनं दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये राहणारा गँगस्टर गोल्डी ब्रारचा भाऊ विक्रम ब्रार याने त्याच्याशी इन्स्टाग्राम आणि सिग्नल अॅपवर करण जोहरकडून खंडणी घेण्याबाबत चर्चा केली होती.
हेही वाचा :