Majha Katta : अशी बांधली गेली श्रेयस आणि दीप्तीच्या लग्नाची गाठ, 'माझा कट्ट्या'वर सांगितला प्रेमाचा प्रवास
Majha Katta : अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री दीप्ती तळपदे यांनी त्यांच्या प्रेमाचा प्रवास माझा कट्ट्यावर सांगितला आहे.
Shreyas and Dipti Talpade Love Story : सध्या प्रेमाचा आठवडा सुरु आहे. तसेच व्हॅलेंटाईन्स डे (Valentines Day) देखील जवळ आला आहे. त्यामुळे या प्रेमाचा वातावरणात एक प्रेमळ जोडपं माझा कट्ट्यावर (Majha Katta) आलं होतं. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री दीप्ती तळपदे (Dipti Talpade) या दोघांनीही माझा कट्ट्यावर त्यांच्या प्रेमाचा प्रवास सांगितला. दीप्तीला भेटलेला पहिला क्षण ते लग्नापर्यंतचा निर्णय या सगळ्याविषयी श्रेयस माझा कट्ट्यावर व्यक्त झाला आहे.
काही दिवसांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून स्थिरावत श्रेयसने शो मस्ट गो ऑन म्हटलं. यामध्ये त्याची पत्नी दीप्ती हीने श्रेयसला खंबीर साथ दिली. आजही हा माझा दुसरा जन्म आहे आणि तो मला दीप्तीमुळेच मिळाला असल्याचं श्रेयस सातत्याने म्हणत आला आहे. आयुष्यातल्या या कठीण काळाविषयी देखील श्रेयस आणि दीप्तीने माझा कट्ट्यावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशी झाली दीप्ती आणि श्रेयसची भेट
दीप्ती ही केळकर महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेत होती. महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी तेव्हा श्रेयसला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावेळी दीप्तीने श्रेयसला हे निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण देण्याच्या निमित्ताने श्रेयस आणि दीप्तीची पहिल्यांदा फोनवरुन बोलणं झालं होतं. दीप्तीने तेव्हा श्रेयससोबत फोनवरुन साधलेल्या संवादावरुनच ती मला आवडू लागली अशी कबुली देखील श्रेयसने माझा कट्ट्यावर दिली.
यावर बोलताना श्रेयसने म्हटलं की, 'तिने मला निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा मला विचारलं की मला तुम्हाला निमंत्रण द्यायचं आहे मी तुम्हाला कुठे भेटू शकते. हा संपूर्ण संवाद तिने इंग्रजीमधून केला. मी तिला एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा म्हणून बसने कसं यायचं सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली की गाडी घेऊन येणार आहे. तिथेच माझी पहिली विकेट गेली. त्यानंतर कार्यक्रमाच्या आधी तिने मला विचारलं की, तुम्ही कसे येणार आहात. तेव्हा मी तिला आधी म्हटलं बसने येईन. त्यानंतर मला वाटलं की आपण प्रमुख पाहुणे म्हणून जाणार आहोत, म्हणून मी तिला म्हटलं की, मी रिक्षा येईन. शेवटी तिच मला म्हणाली की आम्ही कॉलेजकडून गाडी पाठवू.'
आणि तिने हो म्हटलं - श्रेयस तळपदे
मी दीप्तीला थेट लग्नासाठीच विचारलं होतं. त्यामध्ये कोणताही संभ्रम नव्हता. तिच्या आयुष्यात कोणी असेल किंवा कोणाचा ती विचार करत असेल याचा मी विचार केला नाही. मी तिला म्हटलं तू मला आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, अशी थेट मागणी श्रेयसने दीप्तीला घातली होती. त्यावर दीप्तीने विचारलं आणि 31 डिसेंबर रोजी श्रेयस आणि दीप्तीने लग्नगाठ बांधली.
मी त्याला विचार करते म्हणून सांगितलं - दीप्ती तळपदे
जेव्हा श्रेयसने दीप्तीला विचारलं तेव्हा दीप्ती तिच्या पुढच्या शिक्षणाचा विचार करत होती. परदेशात जाऊन दीप्ती परदेशात शिक्षण घेणार होती. पण काही कौटुंबिक कारणास्तव दीप्तीला जाता आलं नाही. पण त्यावेळी ती जिथे कुठे जाईल तिथे येण्याची तयारी श्रेयसने दाखवली होती. त्यानंतर दीप्तीने तिचा निर्णय बदलला आणि तिनेही श्रेयसला होकार दिला.