Majha Katta : जिथे त्याच्यासाठी सगळं थांबलं होतं, तिथून माझी खरी परीक्षा सुरु झाली, 'माझा कट्ट्या'वर 'त्या' कठीण काळाविषयीचा दीप्ती तळपदेने सांगितला अनुभव
Majha Katta : काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावर मात करत श्रेयसने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. या काळामध्ये श्रेयसची पत्नी दीप्ती हीने त्याची साथ दिली.
![Majha Katta : जिथे त्याच्यासाठी सगळं थांबलं होतं, तिथून माझी खरी परीक्षा सुरु झाली, 'माझा कट्ट्या'वर 'त्या' कठीण काळाविषयीचा दीप्ती तळपदेने सांगितला अनुभव Majha Katta Marathi Actor Shreyas Talpade and his wife Dipti Talpade shared their experienced while shreyas was suffered from heart attack detail marathi news Majha Katta : जिथे त्याच्यासाठी सगळं थांबलं होतं, तिथून माझी खरी परीक्षा सुरु झाली, 'माझा कट्ट्या'वर 'त्या' कठीण काळाविषयीचा दीप्ती तळपदेने सांगितला अनुभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/6281586f49abfae4d382726feec55d711707479962287720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जिथे त्याच्यासाठी सगळं थांबलं होतं, तिथून माझी खरी परीक्षा सुरु झाली होती, असं म्हणत दीप्ती तळपदेने (Dipti Talpade) त्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण काळाविषयी 'माझा कट्ट्या'वर भाष्य केलं. 14 डिसेंबर रोजी श्रेयसला (Shreyas Talpade) शूटिंगच्या वेळीच हृदयविकाराचा झटका आला होता. हा झटका इतका गंभीर होता की काही मिनिटांसाठी त्याचा श्वास थांबला होता, हृदय बंद पडलं होतं. .वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर तो क्लिनिकली डेड होता. या सगळ्यात दिप्तीने, श्रेयसच्या बायकोने त्याला प्रचंड खंबीर साथ दिलीये आणि श्रेयसही म्हणतो की त्याला मिळालेला नवा जन्म दिप्तीमुळेच आहे.
'मला त्या दिवशी श्रेयसला बघून कळलं त्याला काहीतरी होतंय'
श्रेयस अशी व्यक्ती आहे की त्याला ऊन खूप आवडतं, पण त्या दिवशी त्याने पॅकअप झाल्यानंतर मला कॉल केला आणि सांगितलं की दीप्ती मी आज खूप थकलोय, आज खूप ऊन होतं. त्यानंतर तो घरी आला तेव्हा मला त्याच्यात फार वेगळं जाणवलं. त्याचं तोंड वैगरे लाल झालं होतं. मी आमच्या डॉक्टरांना कॉल केला आणि म्हटलं की डॉक्टर Shreyas is not looking good. त्यावेळी डॉक्टरही माझ्यावर थोडे चिडले आणि त्यांनी मला विचरालं तुला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली औषधं मी त्याला दिली, असं दीप्तीने म्हटलं.
मी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला - दीप्ती तळपदे
दीप्तीने म्हटलं की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयससाठी अत्यंत कठीण असा काळा होता. वेलकम 2 च्या शूटींगदरम्यान श्रेयसला त्रास होऊ लागला. त्यानंतर तो घरी आल्यानंतरही त्याला अस्वस्थ जाणवत होतं. त्यावेळी मी डॉक्टरांना देखील फोन केला. त्यांनी मला काही औषधं सांगितली. पण श्रेयसला बरचं वाटत नव्हतं. शेवटी मी त्याला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही हॉस्पिटलपासून अवघ्या काही मिनिटांवर होतं, त्यावेळी श्रेयस कोसळला. त्या रस्त्यावर खूप ट्रॅफिक होतं पण हॉस्पिटल तिथून फार जवळ होतं. तोपर्यंत त्याला हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणंही नव्हती. त्याच्या छातीत दुखत नव्हतं. फक्त त्याचा हात दुखत होता. गाडीत बसल्यावर त्याने मला सांगितलं की दीप्ती माझा हात खूप दुखतोय.
हॉस्पिटलपर्यंतचा कठीण प्रवास
आम्ही गाडीने गेलो. पण त्या रस्त्यावर खूप ट्रफिक होतं, दोन मिनिटावर हॉस्पिटल होतं. पण ट्रफिक असल्यामुळे आम्हाला यु टर्न घेऊन जायचं होतं. पण तेवढ्यातच गाडीत श्रेयस कोसळला. मला काहीच कळलं नव्हतं. शेवटी मी गाडीतून उतरले. छोटी गल्ली होती. तिथून त्याला उचलून घेऊन जाणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. माझ्याबरोबर आमचा ड्राईव्हर होता फक्त. मी त्या गाडीतून बाहेर पडले आणि आजूबाजूच्या लोकांना मदत मागितली. त्या लोकांना तोपर्यंत माहीत नव्हतं की श्रेयस तळपदे आहे. जेव्हा लोकांनी बाहेर काढलं त्यावेळी त्यांना कळालं नक्की कोण आहे. मी सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये धावत गेले. ती हॉस्पिटलची बॅक साईड होती. छोटा गेट होता. त्यावरुन लोकांनी श्रेयसला आत आणलं कारण त्याशिवाय पर्यायच नव्हता, असं दीप्तीने म्हटलं.
'शुद्धीत आल्यावर श्रेयस मला पहिल्यांदा म्हणाला...'
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर श्रेयसला शॉक देण्यात आले, पण त्याने दोन्हीही याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने एनजीओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. हा सगळा 15 ते 20 मिनिटांचा काळ होता. त्यानंतर जेव्हा श्रेयस शुद्धीवर आला, तेव्हा त्याने पहिल्यांदा मला सॉरी म्हटलं. पण त्याला काही कळत नव्हतं. त्याच्या हातामध्ये 9 गोळ्या दिल्या होत्या. पण त्याचं नेमकं काय करावं हे त्याला कळत नव्हतं. शेवटी मी त्याला त्या गोळ्या भरवल्या, हा अनुभव दीप्तीने माझा कट्ट्यावर सांगितला.
आजही माझ्या मनात ती भीती आहे - दीप्ती तळपदे
आजही मध्यरात्री उठून मी अनेकदा त्याच्याकडे पाहते तो व्यवस्थित आहे ना. आधी मला रात्री कधी जाग आली तर घडाळ्यात जर 4 वाजले तर असं वाटायचं अरे तीन तासांनी उठायचं आहे. पण आता रात्री 2 वाजले असले तरीही वाटतं रात्र कधी संपतेय. आजही माझ्या मनात ती भीती बसली आहे. तो कधी फोनमध्ये जरी बघत बसला असेल तर मी त्याच्याकडे फक्त बघत बसते. तो मला विचारतोही, तुला काय झालं. मला फक्त तो आहे आणि तो माझ्यासोबत आहे, हा विश्वास हवा असतो. माझ्यासाठी आजही संध्याकाळी 5 ते 7 ची वेळ ही अस्वस्थ करणारी असते. कधी ती वेळ जातेय असा मला वाटतं. जेव्हा श्रेयसला घरी घेऊन येत होते. त्यावेळी आम्ही जाताना जसे गेलो तीच गाडी सेम जागा, मला त्या क्षणाला वाटलं मला आधी इथून घरी जायचंय, मला नकोय काही, असा एक भावनिक अनुभव दीप्तीने माझा कट्ट्यावर सांगितला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)