(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी, 70 वर्षांनी दिल्लीत होणार सोहळा
Sharad Pawar : 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी शरद पवारांना विनंती करण्यात आली होती. ही विनंती त्यांनी मान्य केली आहे.
Sharad Pawar : सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 21,22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीत पार पडणार आहे. यापूर्वी 1954 साली दिल्लीला 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. यंदा पार पडणाऱ्या या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) आहेत.
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर 70 वर्षांनी दिल्लीत होणार्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात असून त्याचाच भाग म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नितीन गडकरी, यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला. त्यातूनच शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी आज मान्य केली.
शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यीक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे.
त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल असा विश्वास आज सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनिता राजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉ. सतिश देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.