Suhana Khan : अलिबाग जमीन खरेदीप्रकरणी शाहरुख खानची मुलगी सुहाना अडचणीत? शासनाकडे तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?
Suhana Khan : या जमीन विक्रीप्रकरणाची चौकशी सुरू असून अलिबाग तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत.

अलिबाग : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) यांची मुलगी सुहाना खान ( Suhana Khan) अलिबागमधील (Alibaug land purchase) जमीन प्रकरणामध्ये अडचणीमध्ये आली आहे. सुहाना खानने शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात आलेली जमीन परवानगीशिवाय विकल्याचा प्रकार अलिबाग तालुक्यातील थळ येथे समोर आला आहे. विशेष म्हणजे ही जमीन अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी व अभिनेत्री सुहाना खान हिने खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे. या विक्रीप्रकरणाची चौकशी सुरू असून अलिबाग तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत.
तब्बल 12 कोटी 21 लाख रुपयांचा व्यवहार
थळ येथील सर्व्हे नंबर 354/2 मधील 0.60.70 हेक्टर जमीन 1968 मध्ये नारायण विश्वनाथ खोटे यांना लागवडीसाठी शासनाकडून देण्यात आली होती. त्या वेळी ही जमीन विक्री, गहाण किंवा हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होती. मात्र ही अट न पाळता 2023 मध्ये नोंदणीकृत साठे कराराद्वारे जमीन सुहाना खान हिला विकण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल 12 कोटी 21 लाख रुपयांचा हा व्यवहार परवानगीशिवाय झाल्याने प्रशासनाने आता चौकशीला सुरुवात केली आहे.
सुहाना खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता
गेल्या काही वर्षांत अलिबाग परिसर सेलिब्रिटींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. यापूर्वी अभिनेता शाहरुख खान, जुही चावला, विराट कोहली, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, राम कपूर, अक्षय खन्ना, क्रिती सेनॉन यांच्यासह अनेक कलाकारांनी येथे जमीन किंवा बंगल्यांची खरेदी केली आहे. त्यात आता सुहाना खानचेही नाव जोडले गेले आहे. मात्र तिच्या नावावर झालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीत परवानगीशिवाय व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने यामुळे सुहाना खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे. जमिनीच्या मालकी हस्तांतरणाचा हा मुद्दा गंभीर मानला जात असून प्रशासनाच्या चौकशीचा अहवाल येत्या काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.























