(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Pilgaonkar on Lok Sabha : लोकसभा निवडणुकांसाठी सचिन पिळगांवकरांच्या नावाची चाचपणी सुरु? पोस्ट करत म्हणाले 'मी फक्त माझ्या...'
Sachin Pilgaonkar on Lok Sabha : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून काही अभिनेत्यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचं समोर आलं होतं.
Sachin Pilgaonkar on Lok Sabha : लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha 2024) तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली असून शेटच्या टप्प्यातील काही उमेदवार जाहीर करणं आता उरलं आहे. त्यातच काही जागांसाठी कलाकारांची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं जात होतं. भाजपकडून (BJP) कंगना रणौत, हेमा मालिनी, अरुण गोविल या कलाकारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. त्यामुळे शिंदे गटाकडून (Shinde Group) काही कलाकारांच्या नावाची मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांचं देखील नाव होतं. आता सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून काही अभिनेत्यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये सचिन पिळगांवकर, सचिन खेडेकर आणि शरद पोंक्षे यांची नाव पुढे येत होती. पण यावर आता सचिन पिळगांवकरांनी प्रतिक्रिया देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. खरंतर वायव्य मुंबईसाठी नुकतच काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या संजय निरुपम यांच्यासाठी चाचपणी सुरु असल्याचंही कळतंय. पण संजय निरुपम हा अमराठी चेहरा असल्याने त्या भागातील भाजपचे स्थानिक नेते म्हणजे मोहित कंबोज असो किंवा इतर यांच्याकडून फारसा कौल मिळत नसल्याचं सांगण्यात येतंय.त्यामुळे शिंदे गटाकडून सावध पवित्रा घेण्यासाठी या मराठमोळ्या कलाकरांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचंही म्हटलं जात होतं.
सचिन पिळगांवकरांनी काय म्हटलं?
सचिन पिळगांवकरांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी म्हटलं की, मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली, मी हसलो, एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा. 61 वर्ष आपला,सचिन पिळगांवकर. दरम्यान सचिन पिळगांवकर यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चांनाही ब्रेक मिळाला असल्याचं चित्र आहे. पण यावर सचिन खेडेकर आणि शरद पोंक्षे यांची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आली नाहीये. त्यामुळे आता या दोघांच्या नावाची उत्सुकता सध्या पाहायला मिळतेय.
शरद पोंक्षेंचं नाव अग्रस्थानी
दरम्यान अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या हिंदुत्वादाची भूमिका कायम जाहीरपणे मांडत असतात. त्यामुळे या यादीमध्ये शरद पोंक्षेंचं नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जात आहे. पण वायव्य मुंबईसाठी संजय निरुपम यांची वर्णी लागणार की शरद पोंक्षेंना पक्षाचं तिकीट मिळणार याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून जर तिकीट मिळालं तर कोणता मराठी कलाकार राजकारणात प्रवेश करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.