Rohit Sharma : आनंद, कौतुक तरीही डोळ्यात पाणी, रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली अन् रितिकाला अश्रू अनावर; मैदानात मिठी मारतानाचा फोटो व्हायरल
Rohit Sharma : रोहित शर्माच्या निवृत्तीच्या घोषणनेनंतर त्याची पत्नी रितिका हिला देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
Rohit Sharma : इंडिया... इंडिया हा जयघोष शनिवारच्या रात्रीपासून संपूर्ण जगभरात सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर 7 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर (T-20 WorldCup) आपलं नाव कोरलं. रोहितसेनेच्या या कामगिरीचं सध्या जगभरात भरभरुन कौतुक केलं जातंय. वनडे विश्वचषक थोडक्यात हुकल्यानंतर टी-20 विश्वचषकसाठी भारतीयांच्या खूप अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण करत टीम इंडियाने हा विश्वचषक आपल्या नावावर केला. पण या आनंदातच एक गोष्ट मात्र सध्या भारतीयांच्या मनाला चटका लावून गेलीये. ती म्हणजे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने घोषित केलेली निवृत्ती.
खरंतर वनडेमधील पराभवानंतरही त्याने निवृत्ती घ्यावी असं अनेकांनी म्हटलंही. पण यंदा भारताला विश्वचषक मिळवून द्यायचाच असं त्याने ठरवलंच होतं आणि ते लयास देखील नेलं. पण त्याच्या आताच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे भारतीयांना जो सुखद धक्का बसला त्याला थोडी दु:खाची किनार लाभली असं म्हणायला हरकत नाही. याचसगळ्यात रोहितचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्याची पत्नी रितीकासोबतचा हा फोटो आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारुन रडत असल्याचं पाहायला मिळतंय.
आनंदाश्रूंचा क्षण
रितीका आणि रोहितचा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. रितीकाने रोहितला मारेलेली मिठी आणि तिच्या डोळ्यातलं पाणी हे चाहत्यांपासून लपलं नाही. तिच्या त्या मिठीमुळे रोहितला देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. या जोडप्याचा हा गोड क्षण कॅमऱ्यात कैद झाला आणि अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे रितिकालाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Emotional Rohit Sharma with his wife after the historic win. ❤️ pic.twitter.com/bNOn5Ay6Ua
— Johns. (@CricCrazyJohns) June 29, 2024
रोहित आणि विराटच्या निर्णयामुळे निराशा
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियानं (Team India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांनी भारताला 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवून दिलं. टीम इंडिया आणि देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहते आनंद साजरा करत असतानाच विराट कोहलीनं टी 20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या या निर्णयानंतर भारतीय चाहते सावरत असतानाच मॅच संपल्यानंतर रोहित शर्मानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.