Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिन साजरा करताय, मग संविधानाचे महत्त्व सांगणारी ही खास मालिका पाहाच
Republic Day 2022 : 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधान निर्मितीची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेवर कौतुकांचा वर्षाव झाला होता.
देशभरात 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया जाणून घेणेही आवश्यक आहे. भारतात 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधान निर्मितीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी 'संविधान' ही मालिका पाहायलाच हवी. या मालिकेची निर्मिती 2014 मध्ये 'राज्यसभा टीव्ही'ने केली होती. या मालिकेचा पहिला भाग 2 मार्च 2014 रोजी प्रसारीत करण्यात आला होता.
का साजरा केला जातो 'प्रजासत्ताक दिन'?
देशभरात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो.
संविधान मालिकेत काय?
'राज्यसभा टीव्ही'ची निर्मिती असलेल्या संविधान मालिकेचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. या मालिकेत संविधान निर्मितीचे अनेक पैलू समोर आणले गेले. संविधानातील प्रत्येक कलमावर, मुद्यांवर संविधान सभेत झालेली चर्चा, त्याचे देशाच्या दृष्टीने असणारे महत्त्व, तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थिती या मालिकेद्वारे समोर आणण्यात आली. या मालिकेची निर्मिती करताना संविधान सभा, संसदेत झालेली ऐतिहासिक चर्चा, कागदपत्रे यांचा आधार घेण्यात आला. त्यामुळे संविधान निर्मितीची किचकट प्रक्रिया सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला.
कुठं पाहाल?
पूर्वीच्या 'राज्यसभा टीव्ही' आणि सध्याच्या 'संसद टीव्ही'च्या युट्युब चॅनेलवर ही 10 भागांची मालिका पाहता येणार आहे. मालिकेचा प्रत्येक भाग हा साधारणपणे 10 तासांचा आहे. या मालिकेत सचिन खेडेकर, दलिप ताहिल, राजेंद्र गुप्ता, रजत कपूर, नीरद कबी, टॉम अल्टर, दिव्या दत्ता, इल्ला अरूण, हिमानी शिवपुरी आदींसह इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.