पंधरा दिवसात उत्तर द्या, नाराज नियामक मंडळ सदस्यांचे नाट्यपरिषदेला पत्र
कोरोना काळात या मदतीसाठी कोणत्या दानशूर व्यक्तींनी मदत केली, या मदतीशिवाय परिषदेने आपल्या खात्यातून रक्कम दिली आहे का दिली आहे, त्यासाठी संमती घेतली आहे का असे 13 प्रश्न विचारण्यात आले आहेत.
मुंबई : नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीने कोरोना काळात नेमकी कुणाला किती मदत केली. ती मदत ज्यांना झाली ते कोण होते. त्यासाठी जो निधी दिला गेला त्या वाटपासााठी कशा आणि कधी बैठका झाल्या अशा तब्बल 13 मुद्द्यांचं एक पत्र नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळातल्या 22 नाराज सदस्यांनी तयार केलं आहे. या प्रश्नांची पुढच्या 15 दिवसांत उत्तर देण्याची आग्रही मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. नाट्यपरिषदेची कार्यकारिणी नियामक मंडळातल्या सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याबद्दल एक महिन्यापूर्वी 14 नाराज सदस्यांनी नाट्यपरिषदेच्या विश्वस्तांना एका इ मेल द्वारे कळवलं होतं.
हे 3 ऑगस्टचं पत्र असून नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं आहे. यात 13 प्रश्न विचारण्यात आले असून त्याची उत्तरं 15 दिवसांत मिळावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रश्नांमध्ये 1 एप्रिल 2018 ते 1 ऑगस्ट 2020 या काळात नेमक्या किती विश्वस्त मंडळ सभा, कार्यकारिणी मंडळ सभा, नियामक मंडळ सभा आणि सर्वसाधारण सभा झाल्या हे विचारण्यात आलं आहे. शिवाय, इतर मुद्द्यांमध्ये कोरोना काळात कोणत्या नाट्यकर्मींना किती रक्कम दिली गेली, जी मदत केली गेली त्यला विश्वस्त, कार्यकारिणी, नियामक मंडळाने संमती दिली होती का, कधी दिली होती. ज्यांना मदत मिळाली ते नाट्यपरिषदेचे सभासद आहेत का? कोरोना काळात या मदतीसाठी कोणत्या दानशूर व्यक्तींनी मदत केली, या मदतीशिवाय परिषदेने आपल्या खात्यातून रक्कम दिली आहे का दिली आहे, त्यासाठी संमती घेतली आहे का असे 13 प्रश्न विचारण्यात आले आहेत.
या पत्रावर 22 नियामक मंडळातल्या सदस्यांची नावं आहेत. यात योगेश सोमण, मुकुंद पटवर्धन, सुनील महाजन, वीणा लोकुर, सुशांत शेलार, विजय कदम, विजय गोखले, राज काझी, शिवाजी शिंदे, विजय चौगुले आदींचा समावेश होतो. यापैकी 14 सदस्यांनी महिन्याभरापूर्वी नाट्यपरिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून हा प्रकार इ मेल द्वारे विश्वस्तांना कळवला होता. नियामक मंडळाच्या सदस्यांना विश्वासात न घेता सध्याची कार्यकारिणी कार्य करत असल्याची तक्रार ती होती. ही तक्रार करून महिना उलटून विश्वस्तांकडून काही उत्तर न आल्याने आता नाराज सदस्यांनी कार्यकारिणीत प्रमुख कार्यवाह यांना इ मेल द्वारे हे पत्र पाठवलं आहे. या पत्राची प्रत सर्व नियामक मंडळातल्या 60 सदस्यांना देण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना नियामक मंडळ सदस्य सुशांत शेलार म्हणाले, नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीला पाठवलेलं हे पत्र आमच्या अंतर्गत कामाचा भाग आहे. आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आम्हाला कोणताही वाद उपस्थित करायचा नाही. आमच्या प्रश्नांची कार्यकारिणी 15 दिवसांत उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू. अंतर्गत बाब आहे. अंतर्गत रित्या काही प्रश्न िवचारेल आहेत. 14 दिवसात उत्तर मिळे अशी आशा आहे. काही बेसिक प्रश्न आहे. पैसे कुणाला वाटले गेले.